

सातारा : राज्य शासनाच्या सुधारीत धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीरही केले आहे त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मात्र एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरुन शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारीत धोरण 18 जून 2024 रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येत आहे. त्यासाठी राज्यस्तरावरुन बदली प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातही बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कामकाज सुरु झाले आहे. गतवर्षी प्राथमिक शिक्षकांनी विशेष संवर्ग 1 मध्ये जाण्यासाठी शक्कल लढवत दिव्यांग व घटस्फोटीत प्रमाणपत्र सादर केले आणि सोयीच्या बदलीचा लाभ घेतला आहे. मात्र यावर्षीही बदली प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती देवून बदली करणार्या शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे बदल्या पारदर्शक होतील.
एखाद्या शिक्षकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरुन बदली करुन घेतल्याचे आढळल्यास त्यांचे निलंबन करुन त्याच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे बदली प्रक्रियेत कोणी खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास बदलीचा लाभ घेता येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसे घडल्यास तालुकास्तरीय समितीला जबाबदार धरण्यात येणार आहे.