

उंब्रज : तारळे (ता. पाटण) येथील तारळी धरणावर सुरू असलेल्या आदानी कोल्ड स्टोरेज प्रोजेक्टविरोधात 5 मे रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा काढून प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. जिल्हाधिकारी तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन तातडीने चर्चा करावी, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोर्टी (ता. कराड) येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली लिफ्ट इरिगेशन योजनांच्या पदाधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली. यावेळी माजी सभापती देवराज पाटील, पंचायत समिती सदस्य प्रताप चव्हाण, अजितराव पाटील चिखलीकर, मानसिंगराव जगदाळे, संजय थोरात, जयंतराव जाधव, तांबे यांच्यासह विविध पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, आदानी कोल्ड स्टोरेज प्रोजेक्टमुळे शेतीचे वाळवंटीकरण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ज्या धरणग्रस्तांनी त्याग करून हे धरण उभे केले, त्या शेतकऱ्यांनाच अद्याप पाणी मिळालेले नाही. त्याआधीच पाणी वळविण्याचा हा प्रयत्न अन्यायकारक आहे. कराड, पाटण, खटाव, माण व कोरेगाव तालुक्यांतील शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने धरण बांधण्यात आले. मात्र सध्याचा प्रकल्प त्या उद्देशालाच हरताळ फासणारा आहे. यामुळे बागायती जमिनी जिरायती होण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
देवराज पाटील म्हणाले, या प्रकल्पामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. अजितराव पाटील चिखलीकर यांनी सरकार व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे या प्रकल्पाला पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला. उंब्रज, मसूरसह हजारो शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या काहींनी पाणी वळविल्यामुळे आधीच पाणी टंचाई निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.