

तारळे : तारळे परिसरात भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. रात्री अपरात्री चोऱ्या करण्याबरोबर दिवसा ढवळ्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी भुरट्या चोरट्यांना चाप बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. रात्रीचे पेट्रोलिंग सुरू करण्याची मागणी होत आहे.
तारळे हे विभागातील लोकांसाठी बाजारपेठेचे गाव आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, सर्कल, तलाठी, कृषी विभाग, बस स्थानक, पशु वैद्यकीय दवाखाना, शासकीय गोदाम, बँका यांची कार्यालये आहेत. दिवसेंदिवस बाजारपेठेचा विस्तार होत आहे. अनेक सरकारी, खासगी नोकरदार, व्यावसायिक तारळे गावात भाड्याने खोल्या घेऊन किंवा स्थावर खरेदी करून स्थायिक होत असल्याने दिवसेंदिवस गावचा विस्तार होत आहे.
तारळेसह परिसरात यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या तसेच भुरट्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील किती घटना नोंदवल्या गेल्या, किती नोंदवल्या नाहीत, कितीचा तपास झाला हा प्रश्न अनुत्तरित आहेत. यामुळे आता भुरट्या चोरट्यांनी डोकं वर काढले आहे. पोलिस स्टेशनपासून शे दोनशे मीटरवर तारकेश्वर मंदिर आहे. गुरुवारी रात्री येथे चोरट्यांनी कुलूप तोडून दानपेटी फोडली. श्वान पथकाच्या व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान कोंजवडे रोडवर बांबवडे फिडरच्या शेती लाईनवर असणाऱ्या लाईटच्या डीपीतील सहा फ्यूजा दिवसा ढवळ्या चोरून नेण्यात आल्या आहेत. याचबरोबर दुचाकी गाड्यातील पेट्रोल चोर व इतर भुरट्या चोऱ्या होतच आहेत. रात्री पोलिसाकडून सुरु असणारी गस्त काही दिवसापासून बंद झाली असून ती पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.