

सातारा : सातारा जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. खेळाडूंच्या आणि क्रीडाप्रेमींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 15 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दगड-धोंड्यांनी भरलेल्या मैदानावर सराव करणार्या हजारो खेळाडूंची ससेहोलपट थांबणार असून, त्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सातारा जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटरचा धावण्याचा ट्रॅक हा अनेक वर्षांपासून खेळाडूंच्या सरावाचे मुख्य केंद्र आहे. याठिकाणी दररोज एक हजारांहून अधिक खेळाडू सराव करतात. मात्र, या ट्रॅकची अवस्था अत्यंत बिकट होती. मैदानावर पसरलेले दगड-धोंडे यामुळे खेळाडूंना सरावावर मर्यादा येत होत्या आणि दुखापतीचा धोकाही कायम होता. दर्जेदार सरावासाठी अनेक खेळाडूंना वेळ आणि पैसा खर्च करून पुणे किंवा मुंबई गाठावी लागत होती.
या मैदानावर सिंथेटिक ट्रॅक व्हावा, यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यापूर्वी दोन वेळा प्रस्ताव पाठवूनही तो वित्त विभागाच्या मंजुरीअभावी रखडला होता. मात्र, जिल्हा क्रीडा कार्यालयाने चिकाटीने पाठपुरावा सुरूच ठेवला. वाढीव निधीची मागणी करत शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या 15 कोटींच्या निधीमुळे लवकरच 400 मीटरच्या सिंथेटिक ट्रॅकच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या निर्णयामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता सातार्यातच दर्जेदार सुविधा मिळणार असल्याने खेळाडूंचा वेळ, पैसा आणि त्रास वाचणार आहे. या ट्रॅकमुळे जिल्ह्यातून नवीन आणि प्रतिभावान खेळाडू घडण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुणे बालेवाडीच्या धर्तीवर हा ट्रॅक लवकरात लवकर आणि दर्जेदार व्हावा, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे.
400 मीटरचा सिथेटिक ट्रॅक ग्रास ग्राऊंडचा विषय मार्गी लागला आहे. परंतु, संकुलात अद्यापही खुली प्रेक्षक गॅलरी, दोन शेड उभारणे, कबड्डी, खो-खो, वसतिगृहावर एक मजला वाढवणे, प्रेक्षक गॅलरीत खुर्ची बसवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी, लँड स्केप वर्क, विद्युतीकरण हाय मास्ट दिवे बसवणे ही कामे होणे गरजेचे आहे.