

कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) हद्दीत उभ्या असणाऱ्या कंटेनरखाली स्विफ्ट कार घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने कारमधील पुण्याचे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
वैभव गव्हाणे, विशाल काळे (धानोरा, पुणे) अशी दोघा जखमींची नावे असून नावांची सत्यता पडताळण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू होती. तर अन्य दोघा जखमींची नावे सायंकाळपर्यत स्पष्ट होऊ शकली नव्हती. कोल्हापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनलगत कंटेनर उभा होता. त्याचवेळी पुणे बाजूकडे निघालेल्या स्विफ्टच्या चालकाचा ताबा सुटला आणि कार कंटेनरखाली घुसली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
अपघातावेळी कार कंटेनरखाली अडकली होती. त्यानंतर स्थानिकांनी कारमध्ये अडकलेल्या चौघांना अथक प्रयत्नांनी बाहेर काढले. सुदैवाने कारमधील चौघांना किरकोळ दुखापत झाली असून अपघाताची नोंद सायंकाळपर्र्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती. त्यामुळे अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.