

टेंभुर्णी : उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा, यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प होती. उसाला प्रति टन 3500 रुपये दर जाहीर करून पहिली उचल 3200 रुपये देण्याची मागणी करण्यात आली.
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले की, एकाच फडातील ऊस वेगवेगळ्या कारखान्यात गेला तर रिकव्हरी वेगवेगळी सांगितली जाते.तसेच कारखानदार रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारा प्रमाणे दर दिला पाहिजे. वेगवेगळे दर का दिले जातात असा प्रश्न उपस्थित केला. यावेळीं संघटनेचे कार्याध्यक्ष आजिनाथ परबत, हरिभाऊ माने यांचीही भाषणे झाली. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, तालुकाध्यक्ष प्रताप पिसाळ, हरिभाऊ माने, शिवाजी माने, प्रताप गायकवाड, चंद्रकांत कुटे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे अर्धा तास रस्ता रोको झाल्यानंतर मंडळ अधिकारी भगवान मुंडे यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. यादरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे व त्यांच्या सहकारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.