

सातारा : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असलेल्या कोलाहलाचा नेत्यांना नेहमीच सामना करावा लागला. जिल्ह्यात केलेल्या कामामुळे तसेच राजकीय अनुभवामुळे चिमणराव उर्फ सुर्याजी शंकरराव कदम हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यासाठी त्यांना वाई, कोरेगाव, खटाव तसेच कराड तालुक्यातील नेत्यांची मदत झाली. जलसंधारणाची विविध कामे करुन त्यांनी दुष्काळी भागावर फोकसकेले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला सर्वसामान्य शेतकरीही थेट दालनापर्यंत प्रवेश करत असल्याने चिमणराव सर्वमान्य झाले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या बांधिलकीतून चिमणरावांनी झेडपीची कारकीर्द गाजवली.
सुमारे तीन दशकापासून सुरु असलेली काँग्रेस पक्षांतर्गत धूसफूस अद्यापही कायम आहे. यावरून 70 च्या दशकातील राजकीय घडामोडीचा अंदाज येतो. त्यावेळचे राजकारणही जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत राहणारे होते. त्यानंतरच्या तीन दशकानंतर मात्र अस्थिर बनलेल्या राजकारणाने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली. त्यामुळे पक्षाची सत्ता आणि गटातटाच्या माध्यमातून विकासाला खीळ घालण्यासारखे प्रयत्न होवू लागले. मात्र या सर्व कुरघोड्यातून विरोधकांवर मात करणारे चिमणराव कदम हे सर्वसामान्यांत सर्वमान्य व्यक्तीमत्व झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना पक्षांतर्गत असलेल्या दुफळीकडे तसेच विरोधकांकडे लक्ष न देता त्यांनी विकासावर भर देण्याचा प्रयत्न केला.
सुमारे तीन दशकांपूर्वी काँग्रेसचे विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप, दादासाहेब गोडसे, किसन वीर, आ. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिमणराव कदम यांना जिल्हा परिषदेसह तालुक्यातील राजकीय वाटचालीस महत्वाची मदत मिळाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.अध्यक्षपदासाठी मिळालेल्या कमी कालावधीतही त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तसेच नेत्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांना अनेक मध्यस्थांची मदत घ्यावी लागते. अशा प्रकारातून संबंधित नागरिकांची पिळवणूक होण्याचीच दाट शक्यता असते. परंतू, चिमणराव कदम झेडपीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी ही पंरपरा मोडीत काढली.
रोजगार हमी योजना, नालाबंडिंग, बांधबंदिस्त अशा जलसंधारणाच्या विविध योजना त्यांनी मार्गी लावल्या. जिल्ह्यात केलेल्या कामामुळे तसेच राजकीय अनुभवामुळे चिमणराव कदम यांचे गिरवी गाव त्यावेळी राजकारणाचे केंद्रबिंदू बनले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या बांधिलकीतून चिमणरावांनी झेडपीची कारकीर्द गाजवली. फलटण पंचायत समिती सभापती तसेच आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची ताकद वाढवली. शेतीचा विकास तसेच दुर्गम भागातील रस्ते आणि दळणवळणासाठी चिमणरावांनी सातत्याने प्रयत्न केले. फलटण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना मिळणाऱ्या शासनाच्या निधीतून त्यांनी तालुक्यात अनेक लोकोपयोगी कामे केली.त्यामुळे त्यांचे नाव अजूनही जिल्हा परिषदेत पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडे निघत असते. अल्पकालावधीत चिमणरावांनी केलेल्या कामाचे हे द्योतक आहे. (क्रमश:)