

वाई : वाई-सुरूर रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने झाडे तोडली आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. संबंधित ठेकेदाराने वाई-सुरूर रस्त्यावरील एकही झाड पाडायचे नाही. कोणतीही तक्रार न येता रस्त्याचे काम योग्य पद्धतीने दर्जेदार करावे. झाडे चारही बाजूने मोकळी केली असतील तर ती पूर्णपणे भरून घेऊन झाडांना ताण देणे अपेक्षित आहे. तसे न झाल्याने मी कारवाई करणार, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.
सुरूर ते पोलादपूर रस्त्यावर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या ठेकेदाराने मनमानी करत वृक्षतोड केली आहे. यावर नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर दै. ‘पुढारी’ने मोहीम उघडली. ‘पुढारी’ने दणका सुरू केल्यानंतर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महांमडळाने ठेकेदार कंपनीला नोटीस काढून वृक्षतोडीबाबत अहवाल मागवला. तर दुसर्याच दिवशी ना. मकरंद पाटील यांनी ठेकेदारासह महामंडळाच्या अधिकार्यांची वाईत बैठक घेतली. या बैठकीत ना. पाटील यांनी अधिकारी व ठेकेदाराला धारेवर धरले.
यावेळी तहसिलदार सोनाली मेटकरी, भोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब बालचिम, नायब तहसीलदार वैभव पवार, भाऊसाहेब जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी, जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता एस. टी. जाधव, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, महामंडळाचे ठेकेदार समीर रहाटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. पाटील म्हणाले, वाई-सुरूर रस्त्यासाठी मोठ्या संख्येने झाडे तोडल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
या रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने चाललेले काम व पडलेल्या पावसामुळे वाई ते सुरूर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. याला ठेकेदाराची मनमानी कारभार कारणीभूत आहे. ठेकेदाराकडून दिशाभूल करत वृक्षतोड केली असून उध्दट उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ठेकेदाराने कामात सुधारणा करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करणार, असे ना. मकरंद पाटील म्हणाले.
वाई ते मांढरदेवी रस्त्याचेही काम रेंगाळले असून कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. एमआयडीसी ते शहाबाग पर्यंतचे रस्त्यावरील खड्डे त्वरित मुजवावे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदल्यामुळे अपघाताची भीती आहे. यावर पोलिसांनी काय केले? असा सवाल करत ना. पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्यांना जाब विचारत वाहतुकीची जबाबदारी तुमची असून संबंधित ठेकेदारांकडून सर्व सुविधा तयार करून घ्या. पर्यटकांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता घ्या, असेही ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.