

बार्शी : बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेवर भरदिवसा तीन दरोडेखोरांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवत 1 लाख 83 हजार रुपये जबरदस्तीने लंपास केले. मात्र, तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या तिन्ही दरोडेखोरांना कासारवाडी गावालगत हत्यारासह अवघ्या एक तासाच्या आत ताब्यात घेण्यात यश आले आहे. मात्र, त्यांच्याकडे रोकड मिळून आली नाही. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेले तीनही दरोडेखोर बार्शी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास तीन दरोडेखोर दुचाकीवरून बँकेसमोर आले. थेट बँकेत जाऊन पिस्तूल व कोयता दाखवत बँकेत दहशत निर्माण केली. लंपास केलेली रोकड त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने गावाबाहेर गेल्यानंतर रस्त्यावर टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर उपविभागीय अधिकारी, बार्शी तालुका पोलिस, शहर पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबविली. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप ढेरे व त्यांचे पथक शोधासाठी जात असताना कासारवाडी गावालगत दरोडेखोरांच्या गाडीचे टायर फुटल्याने चोरटे अलगत तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाच्या टप्प्यात आले.
दरम्यान, चोरट्यांच्या हातात पिस्तूल असल्याचे पाहूनही ढेरे यांनी धाडसाने पुढे जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या घटनेत चोरांना पकडताना झटापटीत पोलिस कर्मचारी अभय उंदरे हे जखमी झाले आहेत. तेवढ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकही तिथे दाखल झाले. तिघांना ताब्यात घेऊन त्यांना तालुका पोलिस ठाण्यात हलवण्यात आले आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सूर्डी येथे बँकेवर दरोडा पडल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच गावातील काही तरुणांनीही दुचाकीवरून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला होता. त्यामुळे चोरट्यांना नेमकं कोणत्या दिशेने जावे याचा अंदाज आला नाही.