सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन; खा. सुप्रिया सुळे

आम्ही स्वाभिमानी मराठी माणसे; इडा पिडा आमच्या मागे नाही असेही खासदार सुळे म्हणाल्या...
Supriya Sule on Sunetra Pawar
Published on
Updated on

सातारा : 'सुनेत्रावहिनी मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला हार मीच घालेन', असे रोखठोक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी सातारा येथे केले. दरम्यान, निवडून आल्यापासून आमच्या बाबतीतही ऑपरेशन लोटसचा प्रयत्न झाला. पण आमच्यावर ईडी-बिडी चालत नाही. त्यामुळे आमच्या मागे इडापिडा नाही. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसे आहोत, अशा शब्दांत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फटकारले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासमवेत शुक्रवारी सुप्रिया सुळे सातारा दौऱ्यावर आल्या आहेत. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या, २०२९ च्या निवडणुकीत सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन, अशी प्रतिक्रिया दिली.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याच्या संदर्भात त्यांनी यावेळी भाष्य केले. निवड प्रक्रियेवेळी मंत्र्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. संसदेत त्याविषयी चर्चा झाली. बाहेरच्या राज्यातील खासदारांनी, तुमच्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे असे मला विचारले. हे ऐकून मला अतिशय वेदना झाल्या. त्यामुळे माझी अस्वस्थता वाढली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांना मानणाऱ्या पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतील तर त्याची अत्यंत वाईट चर्चा बाहेर होते याचा विचार केला गेला पाहिजे, असे सांगत त्यांनी राडा करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

महाराष्ट्रातील ढासळत्या कायदा सुव्यवस्था स्थितीवर खा. सुळे यांनी आसूड ओढले. गुन्हेगारीत आता पुणे देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राजकारणी म्हणून मी हे बोलत नाही, तर त्या ठिकाणची लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचे दुःख होत असल्याने बोलत आहे. महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सरकारने प्राथमिकता दिली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या वर्दीचा धाक गुन्हेगारांवर बसला पाहिजे, असे त्यांनी यासंबंधीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

सातारा जिल्ह्याने तब्बल सहा दशके पवारसाहेबांवर प्रेम केले आहे आणि त्यांनीही जिल्ह्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पवारसाहेब ज्या ज्या वेळी येतात, त्या त्यावेळी कार्यकर्ते अत्यंत उत्साहात त्यांचे स्वागत करतात असेही खा. सुळे म्हणाल्या.

१५ मे नंतर राज्याचा दौरा करणार !

  • अवकाळी पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होत आहे. त्याचे पंचनामे होत नाहीत. दुष्काळाचे सावट आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जात नाहीत. महागाई, बेरोजगारी असे गंभीर प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला सतावत आहेत.

  • सामान्य माणूस अडचणीत असताना त्याला दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे पवारसाहेब स्वतः आणि मी १५ मे नंतर राज्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत, असे सूतोवाच त्यांनी केले.

२०२९ मध्ये कोण कुठे असेल सांगता येत नाही...

सरकारमधीलच नेते सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीवेळी कोण कुठे असेल हे सांगता येत नाही असे विधान करून खा. सुप्रिया सुळे यांनी खळबळ उडवून दिली.

नसरापूरच्या आरोपीला भरचौकात फाशी द्या

नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या घटनेतील आरोपीला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news