

वाई : राजकारणात बावधन गावाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी दिप्ती पिसाळ यांच्या पाठिशी रहा. बावधनचे वाई तालुक्यातील महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. काशिनाथाचे चांगभलं चा गजर करून बावधनकरांनी एकत्र येत ॲड. दिप्ती पिसाळ यांना जिल्हा परिषदेत पाठवावे. बावधनच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही ना. जयकुमार गोरे यांनी दिली.
बावधन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ॲड. दिप्ती पिसाळ यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, नगराध्यक्ष अनिल सावंत, ॲड. दिप्ती पिसाळ, रोहिदास पिसाळ, भाजप तालुकाध्यक्ष दिपक ननावरे, जितेंद्र पिसाळ, संतोष देशमुख, ॲड. विश्वजीत मोहिते, ॲड. विजयसिंह पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गोरे म्हणाले, वाई मतदारसंघातून पाणी नेऊन माण-खटावचा दुष्काळ संपविण्यात आम्ही यशस्वी झालो. मात्र या भागातील पाणीप्रश्न, रस्ते, पर्यटन व उद्योग विकासाचे प्रकल्प अद्याप अपुरे आहेत. विकास निधीसाठी पत्र शेवटी ग्रामविकास खात्यालाच द्यावे लागते. मग मध्ये अडथळे कशाला हवेत? मुंबईवरून थेट बावधनला विकास निधी देऊ. वाई तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू. या निवडणुकीनंतर सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकेल. मात्र त्या परिषदेत बावधनचा सदस्य नसणे ही चूक होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.