

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली जि.प. गटातील भाजप उमेदवारांच्या पाठिशी मतदारांनी ठाम रहावे, भाजपच जनेच्या विश्वासाचा पक्ष आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडे नका, भागाचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशीलदादा कदम यांनी केले.
कोपर्डे हवेली गटातील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा शिरवडे ता. कराड येथे झाली. यावेळी धैर्यशीलदादा कदम यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. सभेस आ.मनोजदादा घोरपडे, संग्राम घोरपडे, शिरवडे गावचे माजी सरपंच सर्जेराव थोरात, राजन पाटील, निवास थोरात, अजय थोरात, राजेंद्र जगदाळे, शैलेश चव्हाण, महेश चव्हाण, नथुराम पाटील, अनिल डुबल तसेच भाजपाचे कोपर्डे हवेली गटाचे उमेदवार सौ.स्वाती चव्हाण, वाघेरी गणाच्या उमेदवार सौ.अनिता वेताळ, कोपर्डे हवेली गणाचे उमेदवार दत्तात्रय शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
धैर्यशीलदादा कदम म्हणाले, नाकर्त्या लोकांना बाजूला करून सव्वा वर्षांपूर्वी मतदारसंघातून आ. मनोजदादा घोरपडे यांना निवडून दिले. त्यांनी शिरवडे गावासाठी लाखो रुपयांचा विकासनिधी दिला. अपक्ष उमेदवारांवर टीकास्त्र डागताना ते म्हणाले काहीजण म्हणतात एका मिनिटात काँक्रीट रस्ता मंजूर करून आणला. त्यावेळी तुमच्या पाठीमागे कमळ होते. आता कोठून आणणार. या गटातील भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, हे सांगण्यासाठी भविष्यव्यत्याची गरज नाही.
आ.मनोजदादा घोरपडे म्हणाले, हणबरवाडी -धनगरवाडी योजनेच्या नावावर लोकप्रतिनिधींनी मते मागितली पण ती योजना पूर्ण करता आली नाही. त्यांनी दोन पिढ्या या प्रश्नावर मते मागितली. पण मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून 950 कोटी रुपयांची विकास कामे आणली. काहीजण आमच्यावर अन्याय झाला म्हणून ओरड करत आहेत. तुमच्या जीवावर आमदार झालो म्हणता तर तुम्हीच आमदार व्हायचं होतं. तुम्ही आधी जिल्हा परिषद सदस्य होऊन दाखवा, अशी टीका रामकृष्ण वेताळ यांचे नाव न घेता केली.
निवास थोरात म्हणाले, शिरवडे गावाने मतदान रुपी आशिर्वाद दिल्याने कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात विकास कामे करता आली. कोरोना काळात विकास निधी मिळाला नाही. तरीही उरलेल्या तीन वर्षांत तेरा ते पंधरा कोटी रुपयांची विकास कामे केली. दत्तात्रय शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोजदादा घोरपडे, धैर्यशीलदादा कदम यांच्या माध्यमातून या भागात विकास होत आहे. या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या गणात उमेदवारी दिली. हा विश्वास मी कायम राखत तुमच्या सेवेत तत्पर राहिन. अजय थोरात यांनी प्रास्ताविक केले. सभेस कार्यकर्तेे, मतदार यांची मोठी गर्दी होती.