

सातारा : भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर यांचे नाव आघाडीवर आहे. पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
धैर्यशील कदम यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची भाजपमध्ये उत्सुकता आहे. स्वत: धैर्यशील कदम जरी पुन्हा इच्छुक असले तरी भाजपमध्ये सातत्याने नवे चेहरे दिले जातात. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी नव्या चेहर्याला संधी देण्यात येईल, असे सांगितले जात आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी सुनील काटकर, जयकुमार शिंदे, रामकृष्ण वेताळ, रणजित फाळके ही चार नावे चर्चेत आहेत. त्यात सर्वाधिक पसंती सुनील काटकर यांच्या नावाला आहे.
सुनील काटकर हे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. उदयनराजेंची सावली हीच त्यांची ओळख आहे. भाजपच्या मंत्री व आमदारांमध्ये व खाली कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवणारा चेहरा म्हणून काटकर यांची ओळख आहे. दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचाही काटकर यांच्या नावाला विरोध नाही. शिवाय आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, माजी आमदार मदनदादा भोसले अशा भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुनील काटकर यांच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे. काटकर हे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती होते.
सातारा लोकसभा निवडणुकीत पक्ष व नेते मंडळी यांच्यात त्यांनी चांगला समन्वय ठेवला होता. त्यामुळे काटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकते. जयकुमार शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे.धैर्यशील कदम यांच्या नावाचा विचार झाला नाही तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर हे जयकुमार शिंदे यांच्यासाठी आग्रही राहू शकतील. मात्र, पक्षाने सुनील काटकर यांच्या नावावर एकमत केले तर ना. गोरे, निंबाळकर हेही काटकर यांच्या नावाला पसंती देवू शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे पक्षनिरीक्षक सातार्यात असल्याने भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असेल? याची चर्चा सुरू आहे.