

उंडाळे : कराड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील नांदगाव दूरक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या राहत्या खोपटावर झालेल्या चोरीप्रकरणी तब्बल पंधरा दिवसांनंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तीन ते चार लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून, सुरुवातीला पोलिसांनी फिर्याद न घेता केवळ साधा अर्ज स्वीकारून तपासाकडे टाळाटाळ केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
नांदगाव पोलिस दूरक्षेत्राच्या शेजारीच कृष्णा सहकारी साखर कारखाना व रयत सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. यापैकी 5 डिसेंबर 2025 रोजी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या खोपटावर अज्ञातांनी चोरी केली. शरद उत्तम गोरे, अशोक नामदेव सुळ, सतीश श्रीमंत यादव व राधाकिसन अभिजीत सुळ यांच्या पेटीत ठेवलेले दोन ते तीन लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
चोरीनंतर कामगारांनी तातडीने नांदगाव पोलिसांकडे तक्रार दिली; मात्र ती नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर कारखान्याचे मुकादम, शेती व गट अधिकारी तसेच कारखान्याचे अधिकारी यांनीही पाठपुरावा केला, तरीही पोलिसांनी केवळ तपास सुरू आहे असे सांगत एफआयआर नोंदवली नाही. संशयितांची नावे मिळाल्यानंतर ती पोलिसांना देण्यात आली; तरीही तपासाबाबत समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. किती पेट्या फोडल्या, प्रत्यक्ष तपासात काय कारवाई झाली, याबाबत विचारणा केल्यावरही स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, सातत्याने पाठपुरावा व जनतेच्या रेट्यामुळे अखेर पंधरा दिवसांनी चोरीची फिर्याद नोंदवण्यात आली. या विलंबामुळे नांदगाव पोलीस नेमके कुणाला वाचवत आहेत? अशी चर्चा परिसरात रंगली असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.