Shambhuraj Desai | घेवडा पीक विम्यात आणण्यासाठी पाठपुरावा करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

वाठार स्टेशन, तडवळे संमत वाघोलीत पाहणी
Shambhuraj Desai | घेवडा पीक विम्यात आणण्यासाठी पाठपुरावा करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई
Published on: 
Updated on: 

पिंपोडे बुद्रुक : कोरेगावच्‍या उत्तर भागातील वाठार स्टेशन व तडवळे संमत वाघोली परिसराची पाहणी करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे घेवड्याचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले असून फक्त २५ ते ३० टक्केच उत्पन्न निघत असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर घेवडा पिकाचा पीक विम्यात समावेश व्हावा, यासाठी जिल्ह्याच्या वतीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

वाठार स्टेशन परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेवड्याचे पीक घेतले आहे. यंदाच्या हंगामात घेवड्याचे पीक फुलकळी अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली. त्यामुळे पिकाची वाढ खुंटून उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातातून गेल्याने त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधनच संकटात आले आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाठार स्टेशन तसेच तडवळे संमत वाघोली परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी घेवडा पिकाच्या नुकसानीबाबत पालकमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची दखल घेऊन घेवडा पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. घेवडा पिकाला पीक विम्याचे संरक्षण मिळाल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

या दौऱ्यावेळी संजीवराजे निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, वाठार स्टेशनच्या मंडलाधिकारी रेश्मा चव्हाण, तलाठी सचिन माळी, कृषीअधिकारी ज्ञानदेव जाधव, कृषी पर्यवेक्षक महेश नलावडे, नागेश जाधव, माजी पंचायत समिती उपसभापती संजय साळुंखे, हेमंत दोरके, अजित भोईटे, अविनाश फडतरे, ज्ञानेश्वर लोंढे, इरफान पठाण, मंगेश शितोळे, गणेश चव्हाण, अनिल माने,राजेश काळोखे,रणजीत सरकाळे, विकास मतकर,सचिन लोंढे,राहुल जाधव, महसूल सेवक मोहसीन पठाण, हणमंत तावरे तसेच शेतकरी उपस्थित होते.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news