

सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी आ. मनोजदादा घोरपडे यांनी सदिच्छा भेट घेऊन उंब्रज येथील पारदर्शक उड्डाणपुलाला मंजुरी दिल्याबद्दल प्रसिद्ध सातारी कंदी पेढे देऊन आभार मानले.
उंब्रज येथे गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शक उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित होती. मागील अधिवेशनात आ. मनोजदादा घोरपडे यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर अधिवेशन काळातच त्यांनी ना. गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपुलासाठी मागणी केली. ना. गडकरी यांच्या सूचनेनुसार त्यांच्या तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक अहवाल तयार केला. योग्य प्रस्ताव सादर करून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने अखेर उंब्रज उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असून या कामाचे टेंडरही निघाले आहे. यावेळी ना. गडकरी यांनी उंब्रज उड्डाणपुलाचे काम लवकर व दर्जेदार पद्धतीने करण्यात येईल, तसेच कोणत्याही ठिकाणी अतिरिक्त भूसंपादन केले जाणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली. याबद्दल आ. मनोजदादा घोरपडे यांनी ना. गडकरी यांची भेट घेत आभार मानले.
दरम्यान, वेणेगाव, काशिळ व कोपर्डे येथील नदी संगमावरील पुलासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कराड उत्तर मतदारसंघातील रस्ते सीआयआरएफ निधीतून काँक्रिट करण्याचा आराखडा तयार आहे. त्यासाठी आवश्यक निधीची मागणीही आ. मनोजदादा घोरपडे यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली आहे.