वीज पोल शिफ्टिंगचा प्रस्ताव सादर करा

वीज पोल शिफ्टिंगचा प्रस्ताव सादर करा

लोणंद : पुढारी वृत्तसेवा माऊलींच्या पालखी मार्गावरील लोणंद शहरातून जाणार्‍या रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे पोल शिप्ट करून तारा भूमिगत नेण्याच्या कामाचा प्रस्ताव सादर करावा. विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केला जाईल. नवीन पालखी तळासाठीही सहकार्य केले जाईल. वारकर्‍यांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ते पूर्ण करून घेण्यासाठी वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्ववनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पालखी मार्ग व मुक्काम ठिकाण आदींची पाहणी करताना लोणंद येथील पालखी तळावर ना. रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, तहसिलदार चेतन मोरे, बीडिओ अनिल कुमार वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड ,सपोनि विशाल वायकर, उप अभियंता सचिन काळे, ज्येष्ठ नेते सुभाष क्षीरसागर, सतीश भोसले ,बापूराव धायगुडे -पाटील, राहुल घाडगे, ऋषिकेश धायगुडे- पाटील, अतुल पवार, गणेश शेळके-पाटील, विशाल पावसकर, संदीप पावसकर, नगरसेविका तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, संदीप शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ना. रविंद्र चव्हाण म्हणाले, प्रत्येक विभागांना देण्यात आलेल्या जबाबदार्‍या या वेळेवर पूर्ण करून घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा यावेळी यावर्षी जुलै ऐवजी जून महिन्यात येत आहे. उन्हापासून वारकर्‍यांचे सरंक्षण होण्यासाठी पालखी मार्गावर मंडप टाकण्याचे नियोजन केले जात आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे वारकर्‍यांना नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून पालखी तळात वाढ व्हावी. यासाठी लोणंदच्या विकास आराखड्यामध्ये नगरपंचायतीने फलटण रोडवर 16 एकर क्षेत्र पालखी तळासाठी आरक्षित केले आहे. या नवीन पालखी तळासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल असेही ना. चव्हाण म्हणाले. दरम्यान, यावेळी हर्षवर्धन शेळके-पाटील, राहुल घाडगे, संदीप शेळके यांनी ना. चव्हाण यांच्याकडे समस्या मांडल्या. याप्रसंगी तेजस क्षीरसागर, रवींद्र भोसले, प्राजीत परदेशी, नवनाथ शेळके उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news