

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 800221251 हा एक महान आधार ठरला आहे. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षितता हा उदात्त हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत तब्बल 308 तक्रारींची नोंद झाली आहे. ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली, तरी ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या तक्रारींमध्ये गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत. त्यामध्ये वेळेवर बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी बसेस बसथांब्यावर थांबत नसल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पासधारकांना प्रवेश नाकारणे. बहुतांश लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तत्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत.
तक्रार पेटी नव्हे, 100 टक्के निराकरण...
एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाईनवर तक्रारींची नोंद न घेता, या 308 तक्रारींचा आधार घेऊन मूलभूत कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात. अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे हे एसटी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. तक्रारींच्या 100 टक्के निराकरणावर लक्ष केंद्रित केल्यास, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ तक्रार पेटी न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे विश्वास केंद्र बनेल, असे मत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले.