

कराड : मागील काही महिन्यांपासून कराड - पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा कोलमडली आहे. डिझेलचे पैसेही मिळत नसल्यानेही काही गावात एसटी फेर्या कमी करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयासाठी कराडला यावे लागत असल्याने ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर एसटी न आल्यास अथवा एसटी सेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. आठ ते दहा दिवसापूर्वी आवाज उठवूनही एसटी सेवा विस्कळीत असल्याने आता विद्यार्थ्यांकडून आंदोलनाचे संकेत दिले जात आहेत.
कराड व विद्यानगर (सैदापूरमध्ये) विविध महाविद्यालय, शाळा, खाजगी क्लासेस यामध्ये शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची संख्या 20 ते 25 हजारांच्या घरात आहे. यात पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, मल्हारपेठ विभागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र कराड- ढेबेवाडी मार्गावर सकाळच्या वेळेस एसटीच्या फेर्या कमी होत आहेत. त्यामुळे पास असतानाही एसटी अभावी जास्त पैसे देऊन विद्यार्थ्यांना वडापने प्रवास करावा लागत आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी सवलतीच्या दरात मासिक पास देण्यात आले आहेत.
मात्र एसटी फेर्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना वडापचा आधार घ्यावा लागत आहे. अशीच परिस्थिती अबालवृद्धांचीही असून पाटण तालुक्याप्रमाणेच कराड तालुक्यातील आटकेसह अनेक गावात अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळेच सवलती शिवाय प्रवास करावयाचा झाल्यास एक दिवसासाठी 50 ते 60 रुपये विद्यार्थ्यांना मोजावे लागतात. केवळ विद्यार्थ्यांना त्रास होतो असे नाही, तर पालकांनाही याची आर्थिक झळ सोसावी लागते आहे.
त्यामुळेच शाळा, महाविद्यालये महिना, दीड महिन्यात बंद झाल्यानंतर एसटी सेवा ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी बंद होणार नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विशेषतः दहावी आणि बारावीच्या मुलांना जादा क्लासेससाठी कराडला यावेच लागते. अनेकदा सकाळी लवकर यायचे असतानाही एसटी वेळेवर मिळतच नाहीत. तर संध्याकाळच्या वेळेस वेळेवर बसेस मिळत नसल्याने अनेकदा वडापचा आधार घ्यावा लागतो आहे अथवा बसस्थानकावर एक ते दीड तास प्रतिक्षा करावी लागत आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत अनेकदा एसटी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि पालकांच्या खिशाला बसणारी झळ याचा गांभीर्याने विचार तरी होणार का ? असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांना उतरावे लागत आहे रस्त्यावर...
यापूर्वी विंग परिसरातील विद्यार्थ्यांनी कराड - ढेबेवाडी मार्गावर एसटी अडवून ठेवली होती. असाच प्रकार सुपनेनजीक घडला होता. यावेळी विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्याचबरोबर आटकेसह अन्य काही गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी वेळोवेळी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत वेळप्रसंगी एसटी अडविण्याची भूमिका यापूर्वी जाहीर केली होती. सध्यस्थितीत अनेक गावात एसटी जात नसल्याने विद्यार्थ्यांना मुख्य मार्गासह महामार्गावरच उतरावे लागत आहे आणि तेथून पुढे गावापर्यत पायपीट करावी लागत आहे.