

सातारा : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. निवडणुकांमध्ये ज्यांना पक्षाने तिकिटे दिली त्यांनी पक्षाच्या बैठकीला आलेच पाहिजे. तुम्ही नाही आला तर दुसरा उमेदवार तयार करण्याची ताकद शिवसेनेत आहे. संघर्ष हा शिवसेनेच्या पाचवीला पूजला आहे. शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. सगळे एकत्र आले तर जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकू शकतो. साताऱ्याच्या राजकारणाकडे बघून राज्याचे राजकारण ठरते, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यू येथे आयोजित सातारा लोकसभा व विविध मतदार संघ पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, संपर्कप्रमुख शरद कणसे, रेश्माताई जगताप, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओबळे, पै. चंद्रहार पाटील, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव, निलेश मोरे, संभाजी पाटील, प्रदीप माने उपस्थित होते.
ना. सामंत म्हणाले, सातारा जिल्ह्याचा आढावा घ्यावा, अशी परिस्थिती नसून पक्ष संघटन वाढले आहे. पक्षात बीएलए पद महत्वाचे असून त्यांनी संघटन वाढवले पाहिजे. आपण एकदिलाने सातारा जिल्हा शिवसेनेचा आहे हे दाखवून देऊ. सातारा जिल्हा परिषद घटनेचा परिणाम हा 12 मतदार संघात झाला आहे. एक पोलिस अधिकारी जर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यावर धावून येतो ही गोष्ट योग्य नाही. राष्ट्रवादीचे सदस्य दयानंद भोसले आपल्या व्यासपीठावर आहेत. त्यामुळे कोरेगावात काय तरी घडणार हे नक्की, असेही ते म्हणाले.
ना. देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री ना. शिंदे हे पक्षाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरायला लावतात म्हणजे राज्यात भगवा फडकवायचा आहे. पक्ष मजबूत आणि बळकट करायचा आहे. नुसते बिएलए कार्ड गळ्यात घालून मिरवायचे नाही नियमाप्रमाणे काम करायचे आहे. आताच्या बांधणीवरुनच 2029 च्या निवडणुका ठरल्या आहेत. सन 2022 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर खरी शिवसेनेला उभारी आली. जिल्हा, तालुकास्तरावर सुमारे 150-175 पदाधिकारी नेमणार असून त्यात काम करणाऱ्याला संधी देणार आहे. प्रत्येक तालुक्यात पालकमंत्री आपल्या दारी अभियान राबवणार आहे.