

कोडोली : कोडोली जिल्हा परिषद गटात विकासाचे नवे पर्व उभे रहात आहे. मिळत असलेल्या नागरी सुविधा व होत असलेल्या विकास कामांचा अनुभव जनता घेत आहे. या संपूर्ण गटाचा कायापालट भाजपने केला आहे. त्यामुळे नीता खरात या सुशिक्षित व जनतेसाठी लढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे रहा, असे आवाहन आ. महेश शिंदे यांनी केले.
कोडोली जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार नीता बाळासाहेब खरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब खरात, नीता खरात, रामदास साळुंखे, विजया साळुंखे आदी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, कोडोली गट विकासकामांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. शिवछत्रपतींच्या घराण्याशी कायम बांधिलकी जोपासलेल्या या गटातील जनता भाजपच्या पाठीशी ठाम आहे. नीता खरात यांच्या माध्यमातून नवे नेतृत्व उभे रहात आहे. कोडोली गटात भाजप-शिवसेना युतीने रस्ते, आरोग्य, स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा, शिक्षण, महिला व शेतकरी योजना, ग्रामीण विकास या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लागत आहेत. कोडोली गटात खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजे व माझ्या माध्यमातून विकास कामांचे नवे पर्व उभे रहात आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी नीता खरात यांना साथ द्या. त्या स्थानिक व सक्षम, सुशिक्षीत, सुसंस्कृत उमेदवार आहेत. नीता बाळासाहेब खरात, रामदास बबन साळुंखे व विजया सागर साळुंखे यांना साथ द्या.
आ. महेश शिंदे म्हणाले, माझ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोडोली गटातील कोडोली, समर्थनगर, संभाजीनगर, खिंडवाडी, कारंडवाडी, देगाव, जैतापूर, चिंचणेर वंदन ही गावे येतात. महायुती सरकारमुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, युवक आणि लाडकी बहिण यांच्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे गटातील घराघरात बदल जाणवू लागले आहेत. नीता खरात यांचे पती बाळासाहेब खरात यांचे राजघराण्याशी निकटचे संबंध असूनही त्यांनी राजकारणात कोणतेही पद न घेता समाजकार्याकडे लक्ष दिले.
बाळासाहेब खरात यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने येत्या निवडणुकीत कोडोली गटातील उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या या निवडणुकीत विरोधकांना आपला पराभव डोळ्यापुढे दिसू लागल्याने अपप्रवृत्ती, अफवा पसरविल्या जात आहेत. या अपप्रवृत्तीना मतदाराच जागा दाखवतील. कोडोली जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामधील भाजपच्या उमेदवारांना झेडपी व पंचायत समितीत पाठवतील, असा विश्वास आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.