

शिखर शिंगणापूर : शिखर शिंगणापूर येथील मंदिर परिसरात पूजासाहित्याच्या दुकानात येणार्या गिर्हाईकाच्या कारणांवरून दोन दुकानदार महिलांमध्ये बाचाबाची झाली होती. या वादातून एका युवकाने एकावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. चाकूहल्ला झालेले गणपत मारुती पवार (वय 50) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अद्यापपर्यंत गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती शिंगणापूर पोलिसांनी दिली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर परिसरात स्थानिक व्यावसायिकांची नारळ, बेलफुल, मेवामिठाई, पेढेप्रसाद, पूजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. याठिकाणी भाविकांची वाहने लावण्यावरुन तसेच पूजासाहित्य विक्रीवरुन व्यावसायिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये वारंवार वादावादीचे प्रकार घडत आहेत. 27 फेब्रुवारी रोजी गणपत (आप्पा) मारुती पवार यांची पत्नी व कुमार पवार यांची पत्नी या दुकानदार महिलांमध्ये भाविकांनी पूजासाहित्य खरेदी करण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली.
त्यांनतर सायंकाळी गणपत पवार हे शिखर भागातील शिपलागिरी नागेमहाराज मठात बसलेले असताना सागर पवार (वय 27) या युवकाने त्याठिकाणी येऊन गणपत पवार यांना ‘माझ्या आईशी तुझ्या बायकोने भांडण का केले’, अशी विचारणा करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी वाद चिघळल्याने सागर पवार याने आपल्या जवळील चाकूने गणपत पावर यांच्यावर चार ते पाच वार केले. यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर शिंगणापूर पोलिसांनी गणपत पवार यांना उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा शासकीय रुग्णालयात हलवले. सध्या पवार यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.