

परळी : प्रवाशाला एसटीचे तिकीट मागितल्याच्या कारणावरून बस अडवून दमदाटी करण्यात आली. एवढेच काय तर वाहकाच्या अंगावर दगड उगारून जीवे मारण्याची धमकीही दिल्याची घटना घडली. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी बस परळी पोलिस दूरक्षेत्र व पुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यापर्यंत न्यायला लावली. या सार्या प्रकाराने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सातारा-सज्जनगड एसटी बस सज्जनगडच्या दिशेने निघाली होती. एक युवक सातार्यात समर्थ मंदिर येथील थांब्यावर बसमध्ये बसला. गर्दी असल्याने तो दरवाजाच्या कडेला उभा होता. वाहकाने संबंधित युवक प्रवाशाकडे तिकीट काढण्यासाठी पैशाची मागणी केली मात्र दोन-तीन वेळा मागूनही संबंधित प्रवासी तिकीट काढत नव्हता. यावेळी वाहकाने मला इतरांची तिकडे काढायची आहेत पैसे लवकर द्या, असे सांगितले. यावरून संबंधित युवकाने वाद घालत वाहकालाच दम भरला. तुम्ही गाडी गजवडी थांब्याजवळ घ्या, मग तुम्हाला सांगतो, असे म्हणत दमदाटी केली. वाहकाने दुर्लक्ष करत इतर प्रवाशांची तिकिटे काढली. संबंधित युवक सोनवडी-गजवडी थांब्यावर उतरला. एसटी बस सज्जनगडच्या दिशेने गेली.
गडावरून गाडी परत येत असताना ज्ञानश्री इंजिनिअरिंग कॉलेजच्या तीव्र उतारावर संबंधित युवक मित्रांना घेऊन गाडीची वाट पाहत थांबला होता. एसटी पाहताच त्यांनी गाडी थांबवली. त्याने कंडक्टरला शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरवले. दगड घेऊन अंगावर धावून गेला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित प्रकार पाहून गाडीतील महिला प्रवासी घाबरल्या. प्रवाशांनी वाहकाला बस पोलिस स्टेशनला घेण्याची विनंती केली. गजवडी फाट्यावरून गाडी पुन्हा परळीच्या दिशेने आणण्यात आली. मात्र परळी आऊट पोस्टला कोणीही कर्मचारी नव्हते. यावेळी त्यांनी बीट अंमलदार तसेच पोलीस दलाला संपर्क केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी तालुका पोलिस स्टेशनला प्रवाशांसह एसटी नेली.
गेल्या महिनाभरापूर्वीही चिखली जांभे गाडीतील महिला वाहकाला दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. यामुळे एसटी वाहक चालक यांच्यामध्ये या परिसरातील फेर्या करण्याबाबत भीती निर्माण झाली आहे.
सातार्याच्या पश्चिमेला पावसाळी पर्यटन भरले आहे. अनेकदा हुल्लडबाजांकडून पर्यटकांना त्रास दिला जातो. मात्र परळी येथे असलेले पोलिस दूरक्षेत्र बंद असल्यामुळे तक्रार द्यायला जायचे कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.