

कराड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) जीवनवाहिनी ठरलेली लाल परी आज खिळखिळ्या अवस्थेत प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. एकेकाळी वेळेचे भान ठेवणारी आणि प्रवाशांचा विश्वास संपादन करणारी एसटी आता तुटलेले पत्रे, फाटलेली आसनं, धुराचे लोट व थरथरणारे इंजिन घेऊन रस्त्यावरून कसाबसा प्रवास करताना दिसत आहे. कराड आगारातील 25 हून अधिक एसटींची अवस्था दयनिय आहे. पुढील महिन्यात 10 बसेस स्कॅ्रपमध्ये निघतील, असे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
कराड आगारात पूर्वी 110 एसटी बस कार्यरत होत्या. मात्र सध्या केवळ 86 बसेस सेवेत आहेत. त्यापैकी 25 हून अधिक बसेसची कालमर्यादा संपत आली आहे. त्यामुळे या बसेस वारंवार नादुरूस्त होत असतात. उर्वरित बसेस रस्त्यावर धावत असल्यातरी प्रवाशांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी लांब पल्ल्याच्या फेर्या रद्द करण्याचा निर्णय आगार व्यवस्थापनाला घ्यावा लागला आहे. यामध्ये नाशिक, संभाजीनगर, बीड च्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तर पुणे व मुंबईला धावणार्या एसटीच्या फेर्या कमी करण्यात आल्या आहेत. बसेसची संख्या कमी झालीच. शिवाय चालक व वाहकांची संख्याही पुरेशी नाही.
ग्रामीण भागात विद्यार्थी, शेतकरी, महिला प्रवाशी यांचा प्रमुख आधार एसटी आहे. परंतु आज त्यांना प्रवासा दरम्यान फाटलेल्या आसनांवर बसावे लागते, तुटलेल्या खिडक्यांमधून पाऊस व धूळ झेलावी लागत आहे. तुडुंब गर्दी असेल आणि भर दुपारी प्रवास असेल तर धक्केखात होणारा प्रवास प्रवाशांसाठी शिक्षाच असते.
परिवहन महामंडळ कर्जात असल्याचे सांगितले जाते. नवीन बस खरेदीसाठी निधीअभावी अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय चालक-वाहकांचे पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारीही वारंवार होत असतात. या परिस्थितीतही लाल परीचा खडतर प्रवास सुरूच आहे.
प्रवाशांना त्रासदायक अनुभव..
कराड आगारातील पंचवीसहून अधिक एसटी बसेस जुन्या झाल्याने वारंवार बिघाड होत आहे. या बसेस रस्त्यावरून धावत असल्या तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार, मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आजही एसटीवर अवलंबून आहे. पण त्यांच्या प्रवासाचा अनुभव मात्र त्रासदायक ठरत आहे.फाटलेली आसने, एसटीतील धडधड -खडखड आणि रस्त्यात मध्येच बंद पडणारी एसटी असा त्रासदायक अनुभव प्रवासी घेत आहेत.