

ढेबेवाडी : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कराडकडे येणाऱ्या एसटी मार्गात बदल करण्यात आला होता. त्यावेळी अंतर वाढल्याचे कारण देत एसटी महामंडळाने भाडेवाढ केली. मात्र आता मागील दोन महिन्यांपासून कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या एसटी बसेस पूर्वीच्याच मार्गाने कराड शहरात प्रवेश करत आहेत. त्यामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊनही करण्यात आलेली तिकीट दरवाढ कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून लूट सुरू असून प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.अंतर कमी झाले, तरी भाडे कमी का होत नाही? असा थेट सवाल करत वाढीव भाडे तातडीने कमी करावे, अशी ठाम मागणी नाराज प्रवाशांकडून होत आहे.
याबाबत वांग मराठवाठी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष तसेच या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर हे राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. राज्यातील विविध भागांतील मोठ्या शहरांशी कराडचा थेट व्यापार असल्याने येथे नेहमीच प्रचंड रहदारी असते.
सुमारे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम सुरू झाल्यानंतर कराड शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे कोल्हापूर मार्गे पुणे तसेच ढेबेवाडी, शेडगेवाडी व इतर भागांतून येणाऱ्या वाहनांची वाहतूक वारुंजी फाटा - पाटण तिकाटणे मार्गे कोयना नदीवरील पुलावरून पुन्हा कोल्हापूर नाका असा मार्गात बदत करत एसटी वाहतूक कराड शहरात वळविण्यात आली होती.
या बदललेल्या मार्गामुळे एसटी बसेसना अतिरिक्त अंतर कापावे लागत असल्याने महामंडळाने सर्व बसेसच्या तिकीट दरात वाढ केली. तीन किलोमीटर वाढ म्हणजे एसटीच्या भाषेत अर्धा स्टेज, असा हिशोब लावत भाडेवाढ करण्यात आली. परिणामी ढेबेवाडी ते कराड बसभाडे 46 रुपयांवरून थेट 51 रुपये करण्यात आले.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे गेले असून कोयना पुलापासून पंकज हॉटेलपर्यंत भरावाचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून वारुंजी फाटा मार्ग बंद करून पूर्वीप्रमाणे कोल्हापूर नाक्यावरून थेट कराड बसस्थानकापर्यंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. असे असतानाही एसटी महामंडळाने भाडेवाढ मागे घेतलेली नाही, हे अत्यंत धक्कादायक असल्याची भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
मार्ग कमी झाला, पण भाडे कमी नाही, ही सरळसरळ प्रवाशांची लूट आहे, असा आरोप करत एसटी महामंडळाने तातडीने वाढीव भाडे रद्द करून योग्य तिकीट दर आकारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 26 जानेवारी रोजी सर्व प्रवाशांना सोबत घेऊन कराड एसटी आगारात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे.