

सातारा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या लालपरीने डिजिटल सेवेवर भर देण्यास सुरुवात केली आहे. ‘एसटी आपली ॲप’च्या माध्यमातून बससेवेची माहिती उपलब्ध होणार आहे. बसचे वेळापत्रक, मार्ग उपलब्ध सेवा यासह प्रवासाशी संबंधित माहिती सहज मिळणार असल्याने प्रवाशांची बसस्थानकावरील चौकशीसाठी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना एसटी बसचे तिकीट ऑनलाईन बुक करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एमएसआरटीसी रिझर्वेशन हे अधिकृत मोबाइल ॲप विकसीत केले आहे. या ॲपद्वारे प्रवासाचे ठिकाण, तारीख आणि बससेवा निवडून तिकीट आरक्षीत करता येते. विविध प्रकारच्या एसटी सेवांचे आरक्षणही या माध्यमातून करता येते. ऑर्डिनरी, सेमी लक्झरी, शीतल आणि शिवनेरी या सारख्या सेवांचा समावेश आहे. एसी तसेच नॉन एसी सेवांमधून प्रवाशांना आपल्या गरजेनुसार पर्याय निवडता येतो. या ॲपमधून प्रवासाच्या तारखेच्या साधारण एक महिना आधीपर्यंत प्रवाशांना आरक्षण करता येते.
एसटी बसमध्ये गर्दीच्या काळात तिकीट मिळवण्यासाठी स्थानकावर रांगेत उभे राहण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीने ऑनलाईन आरक्षण सुविधा महत्वाची ठरत आहे. प्रवासी घरबसल्या उपलब्ध बस आणि सीटची माहिती तपासून आरक्षण व्यवस्थेत बसचे वेळापत्रक, उपलब्धता आणि भाड्याची माहिती तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे. हे ॲप दिवाळीपूर्वी सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार त्यांची कार्यवाही सुरू झाली आहे. ॲपमुळे एसटीही आता हायटेक होऊ लागली आहे. एसटीच्या अधिकृत ॲपमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी आता एसटीचे तिकीट आरक्षण अधिक सोपे होणार आहे.
ॲपची वैशिष्ट्ये अशी...
या ॲपमध्ये बस सध्या कोठे आहे, कोणत्या मार्गाने येत आहे. किती वाजता बस येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत. राज्यातील जिल्हानिहाय बसस्थानक, तेथील अधिकारी व लॅन्डलाईन नंबरची माहिती व अत्यावश्यक सेवेतील क्रमांक दिले आहेत. धावणाऱ्या बस, बसचे लोकेशन, वेळापत्रक, बसमधील प्रवासी, जवळचे बसस्टॅण्ड, बसबद्दल माहिती दिली गेली आहे. ॲपमध्ये एकूण आठ टप्प्यात प्रवाशांना माहिती देण्यात आली आहे.