

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण 96.75 टक्के निकाल लागला. या निकालात जिल्ह्यात उत्तीर्णांमध्ये मुलींचा टक्का 98.08, तर मुले 95.52 टक्के असल्याने मुलीच हुशार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.8 टक्के राहिले.
सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात यावर्षीही द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, 5 मे रोजी लागलेल्या 12 वी परीक्षेमध्येही राज्यात मुलींनीच बाजी मारली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी दहावी बोर्ड परीक्षा कठोर निर्बंधांमध्ये घेण्यात आली होती. जिल्ह्यात 116 केंद्रांवर जिल्ह्यातील 771 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी समाविष्ट झाले होते. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला.
परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातील 37 हजार 312 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील 37 हजार 203 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 35 हजार 997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्णांमध्ये 18 हजार 399 मुले व 17 हजार 598 मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.52 टक्के असून मुलींचे प्रमाण 98.08 टक्के इतके आहे. या वर्षी देखील उत्तीर्णांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का जास्त आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 96.75 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली. दरम्यान, रिपीटर विद्यार्थी 550 परीक्षेस बसले होते. त्यापैकी 221 उत्तीर्ण झाले असून 40.18 टक्के निकाल लागला.
जिल्ह्यातील 9 हजार 219 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून 80 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळणारे 23 हजार 322 विद्यार्थी आहेत. यावर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली असून त्यांचा टक्का वाढता राहिला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्ण टक्का 2.56 टक्क्यांनी अधिक आहे.