

बामणोली : कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवसागर जलाशयात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोट पलटी होऊन बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी शोधमोहीमेदरम्यान सापडला. रुपेश धोंडिबा तांबे (वय 45, रा. तापोळा, ता. महाबळेश्वर) असे या मृत इसमाचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर तापोळा शिवसागर बोट क्लबचे अध्यक्ष आनंद धनावडे यांच्या नेतृत्वाखाली विशाल बोट क्लब, शिवसागर बोट क्लबचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही संबंधित तरुणाचा मागमूस लागला नव्हता. अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सावरी ते सोनाडी पुलाच्या बांधकामस्थळाजवळ, नदीपात्रातील कॉलम उभारणी सुरू असलेल्या ठिकाणी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास रुपेश यांचा मृतदेह गळाला लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
सातारा वनविभागातील कर्मचारी रुपेश तांबे हे सातारा वनविभागातील उपवनसंरक्षक कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. वडील धोंडिबा तांबे यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर दहा वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती.
या प्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती काळे, हवालदार कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल सय्यद आणि गलांडे तपास करत आहेत. जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच तांबे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.