

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह एकूण सात जणांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे पदक जाहीर झाले आहे. विशेष सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलिस अधीक्षक समीर शेख, फौजदार पारितोष दातीर, तेजस्विनी देशमुख, सचिन भिलारी, अविनाश गवळी मच्छिंद्रनाथ पाटील, प्रिया पाटील, अशी सातारा जिल्ह्यात सध्या कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकार्यांची नावे आहेत.
एसपी समीर शेख यांची नोव्हेंबर 2023 मध्ये सातारा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याअगोदर 2021 ते 2023 या कालावधीत ते गडचिरोली येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. एसपी समीर शेख हे गडचिरोली येथे असताना त्यांनी पोलिस प्रशासनाची धुरा सांभाळली. याशिवाय अनेक मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेवून त्या यशस्वी केल्या. दोन वर्षे तेथे सेवा बजावल्यानंतर सातार्यात पोलिस अधीक्षक म्हणून ते रुजू झाले आहेत.
‘गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या’ माध्यमातून तेथील नागरिकांना वेगवेगळ्या योजना मिळण्यासाठी ही योजना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सुरु केली. समीर शेख यांनी ही अभिनव योजना सुरु करुन दोन वर्षात ते रेकॉर्डब्रेक अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचले. यामुळे शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली. यासाठीच हे विशेष पदक जाहीर झाले आहे.