

सातारा : आईचा खून केल्याप्रकरणी शहाजी लाला पवार (वय 36, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. रहिमतपूर येथे 2021 साली ही घटना घडली होती.
सुलोचना लाला पवार (वय 70) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रहिमतपूर येथे दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी ही घटना घडली होती. आईसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वाहनाचा लोखंडी पाटा डोक्यात व तोंडावर मारुन शहाजी याने खून केला होता. रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्कालीन तपासी अधिकारी सपोनि गणेश कड यांनी तपास करुन न्यायालयात गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल केले.
न्यायालयात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. महेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात एकूण 12 साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस विनोद मोरे यांनी काम पाहिले.