

सातारा : खटाव तालुक्यातील काळेवाडी येथील जवान प्रसाद काळे यांचा विवाह नुकताच पार पडला. विवाहाची पूजा आटोपताच जवान काळे हे देशसेवेत रुजू झाले.
सातारा जिल्ह्याला मोठी सैनिकी परंपरा आहे. जिल्ह्यातील 30 हजारांच्या वर जवान सैन्यदलात सेवेत आहेत. सैन्यदलाच्या तिन्ही विभाग, सीआयएसफ, सीआरपीएफमध्येही भरती झालेले या जिल्ह्यातील जवान देशसेवा बजावत आहेत. पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या देशांतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात युध्दमोहीम आखून पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी ड्रोन, क्षेपणास्त्रांचा वापर केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला. तसेच पाकिस्तानात आत घुसून रडार यंत्रणा, पाकिस्तानी विमानळावर हल्ला चढवला. या युध्दात भारताची सरशी झाली आहे.
दरम्यान, युध्दाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतातील सैनिकांना आपापल्या कॅम्पमध्ये हजर राहण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहेत. तसेच जवानांच्या सुट्ट्या व रजाही रद्द करण्यात आल्या असल्याने जवान देशसेवेसाठी परतू लागले आहेत.
काळेवाडी (ता. खटाव) येथील जवान प्रसाद काळे हे आपल्या विवाहानिमित्त गावी परतले होते. विवाहाची लगबग सुरु असतानाच युनिटमधून त्यांना फोन आला. विवाह आटोपला, पूजाही पार पडली. त्यानंतर हळदीच्या ओल्या अंगानेच ऑपरेशन सिंदूरसाठी जवान प्रसाद काळे आपल्या कॅम्पकडे रवाना झाले आहेत. प्रसाद काळे यांच्या नवविवाहित पत्नीने स्वत:च्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पहिली देशसेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसाद यांना देशसेवेसाठी जाण्यास परवानगी दिल्याने नवविवाहितेच्या या धैर्याला जिल्ह्यातील जनता सलाम करत आहे.