

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी शिक्षिका होत फरशीवर बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला. यावेळी शाळेतील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि शाळेच्या विकासकामांची पाहणी त्यांनी केली. शाळेतील विविध बाबींचा आढावा घेऊन उपस्थितांशी संवाद साधला. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे शिक्षकांकडून यावेळी सांगण्यात आले आहे. या पाहणीवेळी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि इतर गरजांवर यावेळी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि पालकांच्या सूचना जाणून घेतल्या. तसेच शाळेला शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लागणाऱ्या साहित्यांसह इतर गोष्टींचे सहकार्य करण्याचे आश्वासन सभापती सातपुते यांनी यावेळी दिले.