

लोणंद : सत्ता संपत्ती सर्व खोटे आहे. पण वारकर्यांची, जनतेची, समाजाची सेवा करणे हेच खरे काम आहे. सध्या जाती - धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. अशा परिस्थितीत देशाला फक्त वारकरी संप्रदाय वाचवू शकतो. देशाला वारकरी संप्रदायाच्या विचाराची गरज आहे. राजकरणापलिकडे जाऊन वारकर्यांची सेवा करण्याचे डॉ. नितीन सावंत करत असलेले समाजभिमुख काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खा. नीलेश लंके यांनी केले.
लोणंद येथील बळीराजा फाऊंडेशन व खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पाऊले चालती पंढरीची वाट व विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके, माऊलींच्या सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रणदिवे, सुवर्णगाथा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव सावंत, सौ. कौशल्या सावंत, डॉ. शुभदा सावंत, शैलजा खरात, सत्वशील शेळके, किसनराव धायगुडे, काशिनाथ धायगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
खा. लंके म्हणाले, सध्या सर्वांच्या डोक्यात कायम राजकारण असते. परंतु, डॉ. नितीन सावंत, उत्तमराव सावंत यांच्याकडून खरी सेवा केली जात आहे. त्यांचे कार्य हे स्तुत्य आहे. डॉ. नितीन सावंत यांचे कोविड, पालखी सोहळा व शरद कृषी प्रदर्शनातून केलेले काम हे चांगले आहे. धर्मा धर्मात तेढ निर्माण करणे म्हणजे प्रगतीचे लक्षण नाही. राजकारणापलिकडे काहीतरी केले पाहिजे आणि तेच काम आपल्यातील कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. यादृष्टीने वारकरी सांप्रदायाचा विचाराला प्रेरीत होऊन डॉ. सावंत करत आहेत, असेही ते म्हणाले.
राजाभाऊ चोपदार म्हणाले, डॉ. नितीन सावंत व त्यांच्या सहकार्यांकडून वारकर्यांची सेवा करण्याच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत चालली आहे. वारकर्यांची प्रबोधन करण्याची गरज नाही तर वारकर्यांच्या पुढार्यांची प्रबोधन करण्याची गरज आहे. किर्तनात आचारसंहिता पाळण्याची गरज आहे. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत मुक्कामी असताना त्यानुसार मुस्लिम समाजाने बकरी ईद सण एक दिवस पुढे ढकलला होता, याची संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात नोंद झाली होती. डॉ. नितीन सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी हभप सौ. रोहिणी परांजपे यांचे किर्तन झाले.
महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. पवित्र भूमी आहे. ज्यांनी समाजासाठी काम केले त्यांचीच जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. तुकोबा, माऊली यांनी प्रॉपर्टी कमावली नाही. राष्ट्रपुरुष स्वतःसाठी जगले नाहीत, समाजासाठी जगले. आपल्याकडे असा एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो म्हणजे परमेश्वराचा ड्रोन कॅमेरा होय, असेही खा. लंके म्हणाले.