

सातारा : सातारा जिल्ह्यातील दोन हेवीवेट मंत्र्यांमध्ये राजकीय आखाडा सुरु आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काहीच आलबेल नसल्याचे आता समोर येत आहे. ना. जयकुमार गोरे यांनी वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये लक्ष घातले असून त्याला काउंटर करत ना. मकरंद पाटील यांनी माणमध्ये कार्यक्रम घेऊन प्रत्युत्तर दिले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शरसंधान केल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘सोशल वॉर’ सुरु झाले आहे.
भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलच बिनसलं आहे. या दोघांमधील खटकाखटकी ‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर आता सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते असलेल्या नेटकर्यांनी आपापल्या नेत्याची बाजू उचलून धरताना समोरच्यावरही झोड उठवणार्या कमेंटस् सोशल मीडियावर केल्या आहेत.
ना. जयकुमार गोरे हे माण विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजार मतांनी निवडून आलेत. जयाभाऊ यांचा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात स्वतःचा वैयक्तिक गट आहे. जो पक्षाला न मानता जयकुमार गोरे यांना मानणारा आहे, अशी कमेंट एका नेटकर्याने केली आहे. तर त्याच खाली मकरंदआबांच्या कार्यकर्त्याने ओन्ली आबासाहेब अशी कमेंट केली आहे. लगोलग जयाभाऊ आमदार झाल्यापासून माण-खटावला पाणी आणले, आता म्हसवडला एमआयडीसी आली. त्याआधी शरद पवार यांनी माण-खटाववर 30 ते 35 वर्षे राज्य केलं पण काही काम केलं नाही, अशी टीका देखील केली गेली आहे. तर ना. मकरंद पाटील यांचा जनता ग्रुप फार मोठा आहे. अशी कमेंट टाकण्यात आली आहे. तर एकाने जिल्हा परिषद तिकीट वाटताना बहुसंख्य असणार्या समाजाचा विचार करा. अशी मकरंदआबांकडे मागणी केली आहे.
वाई, महाबळेश्वर, खंडाळा जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे लीड वाढीव असणार, पण माण-खटाव दुष्काळी तालुके आहेत. या मतदार संघात विरळ लोकसंख्या आहे, लीड कमीच असणार, माणला पाणी मिळणारच नाही, असे राज्यातील काही नेते सांगत सुटत होते, पण आज पाणी मिळाले, एमआयडीसी, रस्ते यामध्ये विकास दिसतो, अशी कमेंट एकाने केली आहे. सर्वसामान्य लोक भावनिक होऊन मत देतात म्हणून तर असे लोकप्रतिनिधी लोकांना भावनिक करुन लुटतात, आताच बातमी पाहिली कुसगावमधील ग्रामस्थ आणि सर्वसामान्य शेतकरी कित्येक महिने बेकायदेशीर स्टोन क्रशर विरोधी लढा देत आहेत. पण अशा लोकप्रतिनिधींच्या पाठबळाने बेकायदेशीर काम सुरू आहेत, अशी देखील टीका एका कार्यकर्त्याने केली आहे.
ना. मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देखील काउंटर अटॅक करत अबकी बार एक लाख पार, इथे फक्त काम बोलतं फक्त मकरंदआबा पाटील, माण-खटाववाल्यांनी वाई तालुक्याला राजकारण शिकवण्याची गरज नाही. लीड बघितलं का 61 हजार... कसं मकरंदआबा म्हणतील तसं.., 24 तास नेटवर्क असणारा लाडका नेता ना. मकरंदआबा... अशाही कमेंट टाकल्या आहेत.
जनसंपर्क काय ते या बघायला प्रत्येक शनिवार, रविवार बोराटवाडीला म्हणजे कळेल कोणता वारसा नाही, संघर्ष करून निर्माण झालेले नेतृत्व आहे. संघर्षाने मतदारसंघ तयार केला आहे, रेशन दुकानदाराचा मुलगा आमदार, मंत्री झाला, आपणासारखा वडिलांनी मतदारसंघ तयार केलेला नाही. स्वतःच्या ताकदीवर तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात जयाभाऊ नेतृत्व करत आहेत, अशी कमेंट एकाने केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना एका नेटकर्याने ‘भाजप आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात. भाजपचे उपकार विसरु नका, भाजपने हात काढला तर सत्ता, मंत्रीपद भेटणार सुद्धा नाही’, अशी टीका केली.