

सातारा : गरिबांचे आरोग्य मंदिर असलेले जिल्हा रुग्णालयाचा कारभार गेले काही महिने टीकात्मक राहिला. यावेळी येथील वैद्यकीय पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे. तारळे, ता. पाटण येथील 45 वर्षीय महिला तीव्र पोटदुखीच्या त्रासामुळे उपचारास दाखल झाली होती. या महिलेच्या पोटातील चरबीचा तब्बल 6 किलोचा गोळा यशस्वी शस्त्रक्रिया करून काढण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सहा तास शस्त्रक्रिया करून एका जीवघेण्या त्रासातून महिलेला वाचवले आहे.
तज्ज्ञ डॉ. साधना कवारे यांनी महिलेची तपासणी केली असता तिच्या पोटात सुमारे सहा किलो वजनाचा ट्युमर आढळून आला. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरत होते. त्यामुळे प्रथम आवश्यक ते उपचार देऊन तिची प्रकृती स्थिर करण्यात आली. यानंतर शस्त्रक्रियेचा दिवस निश्चित करून डॉ. कवारे आणि त्यांच्या टीमने सुमारे सहा तास चाललेल्या जटिल शस्त्रक्रियेद्वारे महिलेच्या पोटातील सहा किलोचा चरबीचा गोळा यशस्वीरित्या काढून टाकला.
या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. सूर्यकांत बाबर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या महिलेची प्रकृती सुधारली असून तिला गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी संबंधित डॉक्टरांचे अभिनंदन करत रुग्णाची विचारपूस केली. दरम्यान, नवजीवन मिळाल्याच्या भावनेने भारावलेल्या महिलेने साश्रू नयनांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले.