

सातारा : फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर बुधवारी राज्यशासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केल्याचे आदेश काढले. यामध्ये 8 पोलिस अधिकारी यांचा समावेश असून आयपीएस तेजस्वी सातपुते या एसआयटीच्या अध्यक्ष (प्रमुख) असणार आहेत.
दि. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील युवती असलेल्या डॉक्टरने फलटण येथील हॉटेलमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. युवती डॉक्टरने तिच्या हातावर फौजदार गोपाळ बदने व प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याची सुसाईड नोट समोर आले. या आत्महत्येला पोलिस अधिकारी जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस दलासह राज्यात खळबळ उडाली.
युवती डॉक्टर आत्महत्येचे हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता त्यांनी फलटण पोलिस, फलटण रुग्णालयातील डॉक्टर, खासदार व त्यांचा पीए यांनीही वेळोवेळी त्रास दिल्याचे तक्रारअर्जावरुन समोर आले. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती व गूढ वाढले. अशातच डॉक्टर युवतीची आत्महत्या की खून यावरुन तिच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त करण्यात आला. गेली 14 दिवस या प्रकरणात अनेक आरोप, प्रत्यारोप, आंदोलने, मोर्चे, सभा झाल्या. फलटण प्रकरणात दररोज नवनवीन माहिती, खुलासे होत असल्याने व सातारा पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात असल्याने स्वतंत्र पोलिस यंत्रणेकडून तपासाची मागणी होत होती. ही बाब ओळखून अखेर बुधवारी राज्यशासनाने एसआयटी पथकाची घोषणा करुन त्यामध्ये तीन जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.