

सातारा : जिल्ह्यात नऊ सहकारी व आठ खासगी मिळून 17 कारखान्यांकडून 94 लाख 31 हजार 288 टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 91 लाख 50 हजार 27 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात साखर उत्पादनामध्ये 18 लाख 84 हजार 541 क्विंटल इतकी घट झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा चालू ऊस गळीत हंगाम आटोपला असून, सहकारी व खासगी कारखान्यांचा सरासरी उतारा 9.70 टक्के इतका राहिला आहे. सन 2023-24 या काळातील गळीत हंगाम 6 एप्रिलपर्यंत सुरू होता. त्या हंगामात जिल्ह्यात 105 लाख 23 हजार 881 टन उसाचे गाळप करुन 10.49 टक्के साखर उतार्यासह 110 लाख 34 हजार 568 क्विंटल साखर उत्पादित केली होती. यंदा साखर निर्मितीत घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
जरंडेश्वर कारखान्याने ऊस गाळपात आघाडी कायम राखली आहे. तर साखर उत्पादनात कृष्णा सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. साखर उतार्यात रयत सहकारी साखर कारखाना 12.08 टक्के उतारा घेत आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांनी 44 लाख 83 हजार 455 टन ऊस गाळप करत 11.50 टक्के सरासरी उतार्यानुसार 51 लाख 56 हजार 942 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे, तर खासगी कारखान्यांनी 49 लाख 47 हजार 833 टन उसाचे गाळप करत 8.07 टक्के सरासरी उतार्यानुसार 39 लाख 93 हजार 85 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.