

फलटण : फलटण येथील ख्यातनाम उद्योजक, समाजसेवक श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा बंटीराजे खर्डेकर (वय 79, मूळ रा. कोल्हापूर) यांचे शनिवारी (दि. 12) रात्री अल्प आजाराने निधन झाले.
दिवंगत श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे ते बंधू, आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे ते मामा तथा सासरे तर, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे ते वडील होत. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर घराण्याचे वंशज असलेल्या बंटीराजे खर्डेकर यांनी औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी साईराजा फ्रुट अँड फूड प्रोसेसिंग कंपनीची स्थापना करून या कंपनीचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. त्यांनी फलटण येथील श्रीराम साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पदही भुषवले. बंटीराजे यांनी असंख्य गोरगरीब, गरजू लोकांना सढळ हाताने मदत केली. हृदयविकार असलेल्या रुग्णांना त्यांनी विशेष करून नेहमीच मोठे आर्थिक साहाय्य केले. हृदयाच्या शस्त्रकिया मोफत करून देण्यासाठीही त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या पश्चात पत्नी वैशालिनीराजे, मुलगा दीप्तीमानराजे, मुलगी वेदांतिकाराजे भोसले, जावई आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सून व नातवंडे असा परिवार आहे. बंटीराजे यांच्यावर रविवारी सकाळी 10 वाजता साईराजा फॅक्टरी, फरांदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव दीप्तीमानराजे खर्डेकर यांनी पार्थिवास भडाग्नी दिला. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. दीपक चव्हाण, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, धीरेंद्रराजे खर्डेकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, सह्याद्री कदम, सचिन बेडके उपस्थित होते.