Shivaji Maharaj Jayanti: राजधानी साताऱ्यात अवतरली शिवशाही

शाही मिरवणुकीत शिवप्रेमींचा जल्लोष : हत्ती, उंट, घोड्यांनी वेधले लक्ष
Shivaji Maharaj Jayanti
Shivaji Maharaj Jayanti: राजधानी साताऱ्यात अवतरली शिवशाहीPudhari
Published on
Updated on

सातारा : शिंग तुताऱ्यांचा निनाद... टाळ-मृदंगाचा नाद... ढोल-ताशांचा गजर.. फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याची भव्य मिरवणूक राजवाडा येथून काढण्यात आली. घोडे, हत्ती, उंट यासह लोकनृत्यांनी मिरवणूक मार्ग दणाणून सोडला. त्यामुळे राजधानी साताऱ्यात शिवशाही अवतरलेली पहायला मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा व सातारा नगरपालिका यांच्या वतीने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राजवाड्यापासून शिवतीर्थ (पोवईनाका) अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळपासूनच गांधी मैदानावर शिवप्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली. मोती चौक, चांदणी चौक, मोती तळे परिसर अलोट गर्दीने फुलून गेला. शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींसाठी गांधी मैदानावर पारंपरिक वाद्यांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांनी शिवप्रेमींची मने जिंकली. टाळकऱ्यांनी केलेल्या गजरात सातारकर मंत्रमुग्ध झाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व दै. ‌‘पुढारी‌’चे निवासी संपादक व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिश पाटणे यांच्या हस्ते येथील गांधी मैदानावरील ऐतिहासिक राजवाड्यासमोर सिंहासनाधीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन करून या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, ज्येष्ठ पत्रकार सुजित आंबेकर आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीला थाटात सुरुवात झाली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते गोलबागेसमोर पालखीत ठेवलेल्या शिवरायांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही पालखी शिवतीर्थाच्या दिशेने मार्गस्थ झाली. पारंपरिक वाद्यांचा गजर करत छत्रपतींचा अश्वारुढ तसेच सिंहासनावरील पुतळा, प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळा सोबत हत्ती, घोडे, उंट अशी देखणी शाही मिरवणूक निघाली. मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी अलोट गर्दी केली होती. गांधी मैदान गर्दीने फुलून गेले होते.

‌‘शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम अशा दिलेल्या घोषणांनी गांधी मैदान दुमदुमून गेले. वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी असलेले हत्ती, घोडे, उंट मिरवणुकीचे आकर्षण ठरले. हत्ती, उंट, घोडे, मावळे, महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याने शिवकाल अवतरला होता.

यावेळी नगरसेवक सागर पावशे, जयवंत भोसले, राजू गोरे, शंकर माळवदे, अशोक मोने, रवी माने, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते. दरम्यान, लोकनृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर ही मिरवणूक मजल दर मजल करत शिवतीर्थावर येवून पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news