

कराड : देशाच्या अर्थचक्राला गती देणारे महाराष्ट्र राज्य गेल्या बारा वर्षांत पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, रेल्वे आणि सामाजिक विकासाच्या विविध योजनांमुळे नव्या उंचीवर पोहोचल्याचे चित्र दिसून येते. केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांमुळे राज्यातील विकासाचा वेग वाढल्याचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असून या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार अतुलबाबा भोसले म्हणाले, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गाला मिळालेले सहकार्य तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी मिळालेला निधी महत्त्वाचा ठरला. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतूही राज्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्राला विक्रमी निधी मिळाला असून वंदे भारत एक्सप्रेसच्या अनेक सेवा सुरू झाल्या आहेत. स्थानकांच्या पुनर्विकासाबरोबरच प्रलंबित रेल्वे मार्गांच्या कामांनाही गती मिळाली आहे.
उद्योग क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ आणि पीएलआय योजनांचा लाभ राज्याला झाला. औरंगाबादजवळील ऑरिक सिटी, वाढवण बंदर आणि अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क यांसारखे प्रकल्प रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. कृषी क्षेत्रात पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पीएम-किसान सन्मान निधी आणि आपत्ती निवारण मदतीमुळे शेतकर्यांना आधार मिळाला. तर नागरी विकास, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी मिशन, आयुष्मान भारत योजना आणि नागपूर एम्समुळे आरोग्य व जीवनमान उंचावण्यास मदत झाली.