

सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. माझे त्यासाठी समर्थनच आहे. मनोज जरांगे यांच्या मुद्द्याला आमचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे. चर्चेतून हा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा समाजातील गरीब व गरजू मुलांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सातार्यात माध्यमांशी बोलताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. न्याय हक्कांसाठी लढणं, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र, ते घटनेत आणि कायद्यात टिकायला हवे. जरांगे यांच्या मुद्द्याला आमचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे. त्यांना आम्ही भेटलो होतो. समाजाच्या गरजेचा हा मुद्दा आहे. सरकारसोबत चर्चा केल्याशिवाय हा मुद्दा सुटणार नाही. चर्चा करून आरक्षण आपल्या पदरात कसे पडेल, हे मराठा समाजाने पाहावं. मीही मराठा समाजातील आहे. समाजातील अनेक घटकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. या समाजातील एक व्यक्ती म्हणून गरजू मराठ्यांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
महायुतीचे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, असा विश्वासही ना. शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे; मात्र हे आरक्षण मिळू शकणार नाही, असे काही लोक म्हणत होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले होते. मात्र, फडणवीस यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर काही लोक मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात कोर्टात गेले. कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्याने त्याचा लाभ समाजाला मिळू शकला नव्हता, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.