शिवेंद्रराजे-जयकुमार गोरे यांच्यात 100 दिवसांत ‘टशन’

पीडब्ल्यूडी दुसर्‍या, तर ग्रामविकास चौथ्या क्रमांकावर
Satara News
शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे
Published on
Updated on

सातारा : सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात एकूण 48 पैकी 12 विभागांनी 100 टक्के, तर 18 विभागांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मंत्रिमहोदयांचे प्रशस्ती पत्रच समोर आले असून, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विभागाने दुसरा, तर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या विभागाने चौथा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्दिष्ट्यपूर्तीची स्पर्धा लावली. त्यात 100 दिवसांच्या कार्यक्रमात संपूर्ण राज्यात टशन दिसली ती मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मंत्री जयकुमार गोरे यांच्यातच. शिवेंद्रराजेंच्या पीडब्ल्यूडीने दुसरा, तर गोरेंच्या ग्रामविकास विभागाने चौथा क्रमांक पटकावला.

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी शंभर दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार गेल्या शंभर दिवसांत या विभागांनी उद्दिष्टपूर्तीसाठी काम केले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवरील पोस्टद्वारे दिली आहे. या शंभर दिवसांच्या मूल्यमापनात 48 पैकी 12 विभागांनी 100 टक्के, तर 18 विभागांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली. यात महिला व बाल विकास (80 टक्के), सार्वजनिक बांधकाम (77.94 टक्के), कृषी (66.54 टक्के), ग्रामविकास (63.58 टक्के), परिवहन व बंदरे (62.26 टक्के) या पाच विभागांची कामगिरी उत्तम ठरली.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या अखत्यारित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उठावदार काम केले. त्याला ना. शिवेंद्रराजेंची धडाकेबाज कार्यपद्धती फलदायी ठरली. ना. शिवेंद्रराजे यांनी प्रशासनासाठी आदर्श कार्यपद्धती ठरेल, असे धोरण राबवून निर्णय घेतले. अधिकार्‍यांना बुस्टर डोस देवून कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सातत्याने काम केले. नागरिकांची कामे झपाट्याने कशी मार्गी लागतील त्याद़ृष्टीने धोरण अंमलात आणले. त्यामुळे बांधकाम विभागाने शंभर दिवसांच्या उद्दिष्ट पूर्तीमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विभागानेही 63.58 टक्के उद्दिष्ट पार केले आहे. आ. जयकुमार गोरे यांच्या आक्रमक कार्यपद्धतीची छाप पडल्यामुळे या विभागाने ठसा उमटवला. पारदर्शकता, कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब असणारी गुणवत्ता मोहीम राबवली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे, शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे, या उद्देशाने सर्व शासकीय विभागांसाठी 100 दिवसांची मोहीम राबविली होती. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत 10 निकषांवर आधारित केलेल्या मूल्यांकनामध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले व ना. जयकुमार गोरे यांच्या विभागाने घेतलेली भरारी या मंत्रीमहोदयांना त्यांच्या कामाची पोहोचपावती देवून गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news