भाऊसाहेब महाराजांचा ‘छावा’ मंत्री झाला

Satara News | आ. शिवेंद्रराजेंच्या रूपाने सातारा मतदारसंघाला 29 वर्षांनंतर कॅबिनेट मंत्रिपद
Shivendraraje Bhosale |
आ. शिवेंद्रराजे भोसले File Photo
Published on
Updated on

सातारा : विधानसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्क्य घेऊन विजयी झालेले आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा आदर राखत भाजपने त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद बहाल केले. 1995 पर्यंत आ. शिवेंद्रराजेंचे पिताश्री स्व. भाऊसाहेब महाराजांनी सहकार खातेे व ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. आता सातारा मतदार संघाला तब्बल 29 वर्षांनंतर कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले आहे. युती शासनाच्या काळात 1999 पर्यंत श्री. छ. उदयनराजे भोसले हे महसूल राज्यमंत्री होते. मात्र, त्यानंतर आजतागायत सातार्‍याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले होते, ही कसर भरून काढत भाऊसाहेब महाराजांचा ‘छावा’ असलेल्या शिवेंद्रराजेंनी आता बाजी मारली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी 1 लाख 76 हजार 849 मते घेऊन सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. विरोधी सर्वच सातही उमेदवारांचे डिपॉझिट त्यांनी जप्त केले होते. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे 1 लाख 42 हजार 124 इतके मताधिक्क्य शिवेंद्रराजेंनी या निवडणुकीत घेतले. त्यामुळे त्यांचा विजय हा भारतीय जनता पक्षासाठी विशेष ठरला. सातारा-जावलीत कोट्यवधींची कामे करुन ‘पर्मनंट आमदार’ म्हणून ख्याती मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील खात्रीशीर निवडून येणार्‍या आमदारांच्या यादीत सर्वात वरचे नाव हे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच होते. त्यामुळे त्यांचा मंत्रीपदाचा दावा भक्कम समजला जात होता. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीही बाबाराजेंसाठी शब्द टाकला होता. एकूणच बाबाराजेंचे मंत्रीपद फिक्स होते. झालेही तसेच. रविवारी सकाळी गुड न्यूज आली अन् सायंकाळी बाबाराजेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथही घेतली.

शिवेंद्रराजेंचे पिताश्री स्व. भाऊसाहेब महाराजांनी 1978 मध्ये विधानसभेचं मैदान मारलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नव्हतं. ही विधानसभा दोनच वर्षे टिकली. नंतर ते काँग्रेसच्या तिकिटावर 1980 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवडून गेले होते. बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात गृह, कृषी, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला होता.1983 मध्ये ते सहकार राज्यमंत्री होते. 1985 च्या निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्यानंतर प्रशासन आणि बांधकाम खात्याचं राज्यमंत्रिपद त्यांना मिळालं होतं. 1988 मध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद त्यांना प्रथम मिळालं आणि सहकार क्षेत्रातली त्यांची जाण लक्षात घेऊन सहकार खातं त्यांना देण्यात आलं. या माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक सहकारी संस्थांचे जाळे विणले. आमदार आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून 1990 पर्यंत त्यांनी मतदारसंघाचा कायापालट घडवून आणला होता. त्याचा परिणाम म्हणून 1990 च्या निवडणुकीतही ते मोठ्या फरकाने विजयी झाले आणि मंत्रिमंडळात ग्रामीण विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला.

पदांचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केल्यामुळं भाऊसाहेब महाराजांची लोकप्रियता आणि मताधिक्यही वाढतच गेलं. 1995 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी बाजी मारली होती. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भाऊसाहेब महाराजांना उमेदवारी दिली गेली आणि 1 लाख 81 हजारांहून अधिक मताधिक्यानं ते विजयीही झाले होते. 1999 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि भाऊसाहेब महाराजांनी त्यांना साथ दिली. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. मात्र 1990 नंतर सातार्‍याला पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. युती सरकारच्या 1999 पर्यंतच्या कालावधीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना महसूल राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून येऊन देखील तीन वेळा आ. शिवेंद्रराजेंना मंत्रिपदापासून डावलण्यात आले होते.

2019 मध्ये शिवेंद्रराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी ते विजयी झाले. तर 2024 च्या निवडणुकीत पाचव्यांदा आमदार झालेल्या शिवेंद्रराजेंचा योग्य सन्मान करण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यांना थेट कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देवून राजघराण्याविषयीचा आदर भाजप नेत्यांच्या मनात असल्याचेही यानिमित्ताने ना. देेवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. भाऊसाहेब महाराजांप्रमाणेच यशाचा वारू पुढे त्यांचे चिरंजीव शिवेंद्रराजेंनी दौडत ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news