Satara Panchayat Samiti: साताऱ्यात शिवेंद्रराजेंकडून नवख्या चेहऱ्यांना संधी

सभापतीपदी महेश गाडे; उपसभापतीपदी सुषमा जाधव बिनविरोध
Satara Panchayat Samiti
Satara Panchayat Samiti: साताऱ्यात शिवेंद्रराजेंकडून नवख्या चेहऱ्यांना संधीPudhari
Published on
Updated on

कोडोली : सातारा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नवख्या उमेदवारांना संधी देत धक्का तंत्राचा वापर केला. सभापतीपदी कोंडवे गणाचे सदस्य महेश भिकू गाडे, तर उपसभापतीपदी अतीत गणाच्या सदस्या सौ. सुषमा गणेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

सातारा पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रांताधिकारी आशिष बारकूल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार समीर यादव, प्रभारी गटविकास अधिकारी संतोष पवार तसेच सोळा नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. सभापती पदासाठी कोंडवे गणाचे सदस्य महेश गाडे व उपसभापती पदासाठी अतीत गणाच्या सदस्या सुषमा जाधव यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या कालावधीत इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने प्रांताधिकारी आशिष बारकूल यांनी दुपारी 12.30 वाजता गाडे यांची सभापतीपदी व जाधव यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान, पंचायत समितीवर गेली चार वर्षे प्रशासकीय कारभार सुरू होता. त्यापूर्वी सौ. सरिता इंदलकर या सभापती होत्या. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गट-तट न पाहता नवख्या उमेदवारांना संधी दिली. निवड प्रक्रियेपर्यंत इच्छुक उमेदवारांची नावे गोपनीय ठेवल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सभापती व उपसभापती पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडीनंतर सभापती व उपसभापती यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापती महेश गाडे व उपसभापती सुषमा जाधव यांनी स्व. भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्नातील सातारा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या सोळा गणांतील गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेणार असल्याचे सांगितले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने भाजपच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ताधारी व विरोधकांना सोबत घेऊन तालुक्याचा समतोल विकास साधण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news