

सातारा : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील 25 वर्षांहून अधिक जुने पूल, साकव व शासकीय इमारतींची सखोल पाहणी करून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करण्यात यावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.
मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. त्यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राज्यातील जुने पूल, साकव व इमारती यांचे नियमित ऑडिट होणे अत्यावश्यक आहे. यामुळे भविष्यात होणारे अपघात, दुर्घटना टाळता येतील. ज्या संरचना धोकादायक आहेत, त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. संरचनात्मक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
वारीसंदर्भात बोलताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, वारीमार्गावरील रस्ते खड्डेमुक्त राहावेत, वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील, यासाठी समन्वय साधून काम करावे. वाहतूक व जनसुरक्षेच्यादृष्टीने घेतलेले निर्णय हे शानाच्या कृतिशील व जबाबदारीच्या द़ृष्टिकोनाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.