

सातारा : साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना काम कोण करू शकतो, कोणता उमेदवार कसा आहे, कोणाची प्रतिमा कशी आहे, याचा विचार करुन पक्षश्रेष्ठी व स्थानिक पातळीवर चर्चा केली जाईल. काहीजणांनी अपक्ष अर्ज भरले असले तरी भाजपाकडून अधिकृत उमेदवार दिले जाणार आहेत. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास संबंधित इच्छुकांनी भाजपाच्या उमेदवारांना मदत करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. जनतेने व इच्छुकांनीही विश्वासार्ह माध्यमांवरच विश्वास ठेवला पाहिजे. सोशल मीडियावर कुणीही काहीही टाकत असते. त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही ना. शिवेंद्रराजे यांनी केले.
भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर न केल्यामुळे बंडखोरी उफाळून येऊ लागली आहे. साताऱ्यात इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचीही घोषणा न झाल्याने अस्वस्थता वाढली असून तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत विचारले असता मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, साताऱ्यात भाजप व दोन्ही आघाड्या असा विषय नाही. या निवडणुकीत सर्वांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठी तसेच मुख्यमंत्र्यांनीही त्यासाठी मान्यता दिली आहे.
सातारा पालिकेची निवडणूक भाजपाच्या माध्यमातूनच लढवली जाणार आहे. त्यामुळे भाजप व दोन्ही आघाड्या वेगळ्या नाहीत. निवडणूक असल्यामुळे सोशल मीडियात जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासंदर्भात पोस्ट व्हायरल होत असल्या तरी त्या केवळ चर्चा आहेत. उमेदवारीवर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. नगराध्यक्षपदाच्या उमेवारीवर पक्षश्रेष्ठी तसेच स्थानिकांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री यांनी स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेता काम कोण करु शकतो, कोणता उमेदवार कसा आहे, कोणाची प्रतिमा कशी आहे, याची तुम्हाला माहिती असल्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशा सुचना त्यांनी केल्या असल्याचे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
मुलाखती दिलेल्या उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे, याकडे लक्ष वेधले असताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, उमेदवारी अर्ज कुणी भरायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. पण पक्ष म्हणून निर्णय होईल आणि पक्ष म्हणून अधिकृत उमेदवारही दिले जातील, त्यावेळी अशा उमेदवारांना विनंती असेल की पक्षाकडून ते उमेदवार असतील तर चांगलीच बाब आहे. मात्र त्यांना उमेवारी न मिळाल्यास त्यांनी भाजपाचा जो उमेदवार असेल त्यांना मदत करावी, अशी सुचना त्यांनी केली.
भाजप अधिकृत उमेदवार कधी जाहीर करणार, असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्ह्यात सर्व नगरपालिकांचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले आणि सातारा मागे राहिला असे नाही. महाविकास आघाडीकडे उमेदवार नसल्यामुळे भाजपमध्ये काय होतंय याकडे त्यांचे नेते डोळे लावून बसले आहेत. सातारामध्ये त्यांची ताकद आहे, अशी परिस्थिती नसल्याचेही ना. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.