

मेढा : पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई महायुतीबाबत निर्णय घेतील तोच मेढा नगरपंचायतीच्या बाबतीत घेऊ, अशी खोचक प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, मेढा नगरपंचायत पूर्णपणे भाजपचीच होणार असून नगराध्यक्षही भाजपचाच असेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मेढ्यातील वसंतगडावर शनिवारी सायंकाळी मेढा नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, पांडूरंग जवळ, दत्तात्रय पवार, कांतीभाई देशमुख, तुकाराम धनावडे, संजय सपकाळ, शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मागच्या आठवड्यात शिवसेनेचा छोटासा मेळावा झाला. त्यांनी पालकमंत्र्यांना आणले होते. पालकमंत्री युतीबाबत बोलले, ‘महायुती आहे आम्हाला कोणी कमी लेखू नये’. आम्ही तसे म्हणत नाही. जो निर्णय तुम्ही पाटण तालुक्यात घ्याल तोच महायुती म्हणून आम्ही मेढ्यात घेऊ. ते पालकमंत्री आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. ते जो निर्णय घेतील त्यांचे अनुकरण आम्ही नक्कीच करू.
इलेक्शनच्या तोंडावर असल्या लोकांपासून जपून रहा. ही मंडळी निवडणुकीपुरती येतात, निवडणुकीपुरते फिरतात आणि निवडणूक झाली की स्वतःचा सगळा गाशा गुंडाळून परत नवी मुंबईला निघून जातात. ठराविक नेते मंडळी निवडणुकीचं वारं आलं की ही गावाकडे पाच सहा स्वतःचे बॅनर लावतात. कुठेतरी चार-दोन कार्यक्रम घ्यायचे, एखादं जेवण द्यायचं आणि मी आता तालुक्याचा नेता झालो, अशा अविर्भावात लोकांना काहीतरी स्वप्न दाखवतात.
सर्वच्या सर्व जागांवर भाजप आणि भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील यादृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मला खात्री आहे की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची नगरपंचायत होणार, नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, ही खात्री मी शंभर टक्के देतो. प्रास्तविक वसंतराव मानकुमरे यांनी केले तर आभार ज्ञानदेव रांजणे यांनी मानले.