

Shivendraraje Bhosale on Disabled People's Demands
सातारा : दिव्यांगाच्या विविध मागण्यासंदर्भात आरटीओ चौकात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने सामूहिकरित्या सुरू केलेले अन्नत्याग सहाव्या दिवशीही सुरू होते. दरम्यान, आंदोलन स्थळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
दिव्यांगाना संजय गांधी पेन्शन योजनेंतर्गत ६ हजार रुपये मिळावेत. दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी २७४ स्केअर फूट जागा देण्यात यावी. त्यांना संपूर्ण मोफत शिक्षण मिळावे. दिव्यांगांसाठी प्रतिवर्ष ३० लाख रुपये निधी खर्च करावा. सर्व बँक शासकीय कार्यालय येथे दिव्यांगासाठी रॅम्प बनवण्यात यावेत. व्हिलचेअर सुविधा पुरवण्यात यावी. अंत्योदय व दारिद्र्य रेषेखालील यादीतील दिव्यांगांना सरसकट ३५ किलो धान्याचे वितरण करावे. यासह अन्य विविध मागण्यासंदर्भात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.