

सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाचे आपापसात मतभेद नाहीत. मात्र, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांविरोधात फेक नरेटिव्ह पसरवला. आयोगाच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपला टार्गेट करण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी काँग्रेसचे नेते राहूल गांधी स्टंट करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसचा पर्दाफाश झाला, अशा शब्दांत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल चढवला.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सत्तेत असताना काँग्रेसने कधीही संविधान हातात घेतले नाही. संविधान कुणीही बदलू शकत नाही, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. मात्र, निवडणुकीच्या रणांगणात लढाई जिंकू शकत नसल्यामुळे काँग्रेसकडून फेक नरेटिव्ह पसरले जात आहेत. बदनामी करून त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर काँग्रसने निवडणूक आयोग चांगला की वाईट यावर अवाक्षर काढले नाही. विजयी झाल्यावर लोकशाहीचा विजय आणि पराभव झाले की मतदान यंत्रे मॅनेज असल्याचा आरोप काँग्रेस करते, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने व्होटचोरीचा नवा फंडा वापरत अपप्रचार केला जात आहे.
काँग्रेसने आपल्या कारभाराचे आत्मपरीक्षण करावे. कोट्यवधींचे घोटाळे काँग्रेसच्या काळात झाले. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले. मात्र, देशातील जनतेने नरेंद्र मोदींना तिसर्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या स्टंटचा पर्दाफाश झाला. एसआयआरची प्रक्रिया एकमताने असून कुणाचेही त्याबाबत दुमत नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसचे राजकारण किती खोटे आहे हे यावरून स्पष्ट होते. एकीकडे संविधान हातात घ्यायचे आणि दुसरीकडे संवैधानिक संस्थांवर आरोप करणे हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे. फॉर्म क्रमांक ६ संदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे. एसआयआर कार्यक्रमामुळे मतदार याद्या अधिक अचूक करण्यास मदत होणार आहे. मतदार याद्या शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांना सहभागी होण्याची संधी आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाची बदनामी थांबवावी, फेक नरेटिव्ह पसरवणे बंद करावे. पराभावाची कारणे शोधून काँग्रेसने स्वत:चे मूल्यमान करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदि उपस्थित होते.