

सातारा : उरमोडी धरणातील पाणी सातारा तालुक्यातील लावंघर, समर्थगाव- काशीळ व भाटमरळी या उपसा सिंचन योजनेद्वारे त्या- त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून उरमोडी धरणाच्या मोठा पाटबंधारे सिंचन प्रकल्पांतर्गत लावंघर, समर्थगाव- काशीळ आणि भाटमरळी या तीन उपसा सिंचन योजनेच्या निविदा प्रक्रियेस शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तिन्ही योजना आता लवकरच मार्गी लागणार असून शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
उरमोडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास मंत्रीमंडळ बैठकीत 4414.28 कोटी किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या चतुर्थ सुप्रमानुसार सातारा तालुक्यातील 9756 हेक्टर, खटाव तालुक्यातील 9725 हेक्टर व माण तालुक्यातील 9725 हेक्टर असे एकूण 29 हजार 206 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. लावंघर उपसा सिंचन योजनेद्वारे सातारा तालुक्यातील लावंघर, शिंदेवाडी, म्हसकरवाडी, करंजे, करूण, अंबवडे या 6 गावांतील एकूण 355 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
उरमोडी- कण्हेर जोड कालव्याच्या वितरण कुंडामधुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. यासाठी 250 अश्वशक्तीच्या 2 पंप बसवण्यात येणार आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. या उपसा सिंचन योजनेसाठी 39.81 कोटींची तरतूद आहे. मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. समर्थगांव व काशिळ उपसा सिंचन योजनेमुळे 720 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्मितीचा मार्ग सुकर झालेला आहे. समर्थगांव व काशिळ उपसा सिंचन योजनेसाठी 56.26 कोटी एवढ्या खर्चाची तरतूद आहे. समर्थगाव उपसा सिंचन योजनेद्वारे परिसरातील एकूण 345 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. खोडद बंधाऱ्यावरून वितरण कुंडामधुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. यासाठी 215 अश्वशक्ती च्या 2 पंप बसवण्यात येणार आहे. काशिळ उपसा सिंचन योजनेद्वारे गावातील 375 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
खोडद बंधाऱ्यावरुन बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे प्रस्तावित आहे. यासाठी 215 अश्वशक्तीचे 2 पंप बसवण्यात येणार आहे. तसेच भाटमरळी उपसा सिंचन योजनेलाही मान्यता मिळाल्याने सिंचन क्षेक्षात वाढ होणार आहे.